मुंबई: देशाची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा होबार्ट येथे होत असलेल्या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. जवळपास 2 वर्षांनंतर सानिया स्पर्धात्मक टेनिसमध्ये परतणार आहे. सानियाने एकेरीत सहभागी होणे केव्हाच थांबविले असले तरी ती दुहेरी तसेच मिश्र दुहेरीत मात्र 2017 पर्यंत सातत्याने खेळत होती. सानिया आई होणार होती, त्यामुळे तिने टेनिसमधून ब्रेक घेतला होता. तिला एक मुलगा असून इझहान असे त्याचे नाव आहे. सानियाने पाकिस्तानचा क्रिकेटपटू व माजी कर्णधार शोएब मलिकशी विवाह केला आहे.
पुढील वर्षी जानेवारीत होबार्ट येथे होत असलेल्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. तसेच त्यानंतर मुंबईत होत असलेल्या आयटीएफ स्पर्धेत देखील ती खेळणार आहे. सध्या ती पूर्ण तंदुरुस्त असली तरी दोन वर्षांपूर्वी झालेल्या मनगटाच्या दुखापतीमुळे ती चिंतेत आहे. ही दुखापत गंभीर नसली तरी गेल्या काही दिवसांपासून सरावा दरम्यान तिला खेळताना पुन्हा मनगटात वेदना होत आहेत. 2017 मध्ये चायना ओपन स्पर्धेत खेळल्यानंतर तीने ब्रेक घेतला होता.
दुहेरीत सानिया युक्रेनच्या नादिया केचनोक हिच्यासह सहभागी होते. 33 वर्षांची सानिया आजही देशाची अव्वल टेनिसपटू आहे. तिने ज्युनिअर गटात विंबल्डन स्पर्धेत केलेल्या सरस कामगिरीमुळे ती भारताची टेनिस सम्राज्ञी बनली. तीच्याकडून प्रेरणा घेत अनेक मुली या खेळाकडे वळल्या.
खार जिमखाना येथील नव्या टेनिस कोर्टचे उद्घाटन करण्यासाठी सानिया येथे आली होती, त्यावेळी तिने पुनरागमनाचे वेध लागल्याचे सांगितले. तिने जरी ब्रेक घेतला होता, तरी केवळ मुलाचे संगोपन करण्यासाठीच नव्हे तर तिला चिकनगुनियासुद्धा झाला होता. त्याचे उपचारही बरेच लांबले होते. यातून पूर्ण बरे होण्यासाठी तिला जवळपास तीन महिने लागले. त्यामुळे ती आपल्या मुलापासूनही लांब राहात होती.