पुणे :- हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित सातव्या अपोलो हॉटफुट करंडक युवा साखळी फुटबॉल स्पर्धेच्या ११ वर्षाखालील गटामध्ये लौकिक फुटबॉल अकादमी अ आणि ब संघ, साई फुटबॉल अकादमी, उत्कर्ष क्रीडा मंच, मॅथ्यु फुटबॉल अकादमी या संघांनी आगेकूच केली. ११ वर्षाखालील गटाच्या सामन्यात लौकिक फुटबॉल अकादमी ब संघाने स्पोर्ट्स मेनिया फुटबॉल अकादमीचा ५-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला.
लौकिक संघाकडून अनिमेश रोडगे याने दोन गोल तर, अशोक शिंदे, अभिर कुलकर्णी, विराज नानगरे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. स्पोर्ट्स मेनिया फुटबॉल अकादमीकडून अर्णव सुर्यवंशी याने २ गोल, हितांश देशपांडे आणि आतिश मोरे यांनी प्रत्येकी एक गोल केला. रेयांश केतवानी, हिमानिश थिटे आणि सुवर्णनाम सोनावणे यांनी केलेल्या गोलांमुळे साई फुटबॉल अकादमीने उत्कर्ष क्रीडा मंच ब संघाचा ४-२ असा सहज पराभव केला.
स्पोर्ट्स मेनिया आणि फोर लायन्स् फुटबॉल अकादमी क यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. स्पोर्ट्स मेनियाकडून हितांश शहा याने तर, फोर लायन्स् फुटबॉल अकादमी क संघाकडून विहान अरोरा याने गोल केला. अनिमेश रोडगे, अशोक शिंदे, अभिर कुलकर्णी, विराज नानगरे आणि विहान सुर्यवंशी यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर लौकिक फुटबॉल अकादमी ब संघाने साई फुटबॉल अकादमीचा ५-१ असा सहज पराभव केला.
कुशल भालेराव याने नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर उत्कर्ष क्रीडा मंच अ संघाने फोर लायन्स् फुटबॉल अकादमी ब संघाचा १-० असा सहज पराभव केला. ओम साळुंखे आणि अगस्त्य देशमुख यांनी नोंदविलेल्या गोलांमुळे लौकिक फुटबॉल अकादमी अ संघाने फोर लायन्स् फुटबॉल अकादमी क संघाचा ३-० असा सहज पराभव केला.