Apollo Hotfoot Trophy 2024 :- हॉटफुट स्पोटर्स यांच्या तर्फे आयोजित सातव्या ‘अपोलो हॉटफुट करंडक’ युवा साखळी फुटबॉल स्पर्धेत फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमीच्या संघांनी स्पर्धेत दुहेरी मुकूट पटकावला. उत्कर्ष क्रिडा मंच आणि स्टेप ओव्हर फुटबॉल अॅकॅडमी संघांनी अनुक्रमे ११ आणि १३ वर्षांखालील गटाचे विजेतेपद संपादन केले.
बावधन येथील हॉटफुट अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या ९ वर्षाखालील गटात फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी ब संघाने साई फुटबॉल अॅकॅडमीचा ९-२ असा सहज धुव्वा उडवित विजेतेपद संपादन केले.. सामन्यामध्ये रायाह भगत याने ३ गोल तर, मोक्क्ष गांधी, प्रग्यान पॉल आणि अंकुश ओझा यांनी प्रत्येकी दोन गोल केले. फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी क संघाने उत्कर्ष क्रिडा मंच अ संघाचा ८-२ असा सहज पराभव करून उपविजेतपद मिळवले. या गटात फोर लायन्स् ब संघाने ३७ गुणांसह अव्वल तर, फोर लायन्स् क संघाने ३४ गुणांसह दुसरे स्थान मिळवले.
११ वर्षाखालील गटामध्ये कुशाल बागळे, ऋतुराज पाटील, अहान लोहकरे यांनी केलेल्या गोलपूर्ण कामगिरीच्या जोरावर उत्कर्ष क्रिडा मंच अ संघाने ब्राका अॅकॅडमी पुणे संघाचा ३-० असा सहज पराभव केला. फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी अ संघाने फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी क संघाचा ७-० असा धुव्वा उडविला. उत्कर्ष क्रिडा मंच अ संघाने ३९ गुणांसह अव्वल स्थान मिळवत या गटात विजेतेपद मिळवले. फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी अ संघाने ३६ गुणांसह दुसरे स्थान मिळवून उपविजेतेपद मिळवले.
१३ वर्षाखालील गटामध्ये स्टेप ओव्हर फुटबॉल अॅकॅडमी संघाने ब्राका अॅकॅडमी पुणे संघाचा ४-० असा सहज पराभव केला. दनिश गोनल, युग चौहान, रायन मुथदान यांनी संघाकडून गोल नोंदविले. फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी अ संघाने फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीचा ३-१ असा पराभव केला. स्टेप ओव्हर फुटबॉल अॅकॅडमीने ४५ गुणांसह विजेतेपद तर, फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमीने ४० गुणांसह या गटाचे उपविजेतेपद मिळवले.
१५ वर्षाखालील गटामध्ये फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी अ संघाने साई फुटबॉल अॅकॅडमीचा २-० असा सहज पराभव केला. सामन्यात इशान हेगडे आणि रचित नौटीयाल यांनी गोलपूर्ण कामगिरी केली. इक्बाल शेख आणि संजीत जाधव यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर स्पोटर्स मेनिया संघाने फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी क संघाचा २-० असा सहज पराभव केला. या गटामध्ये फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी अ संघाने ४० गुणांसह विजेतेपद तर, स्पोटर्स मेनिया ३९ गुणांसह उपविजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण अपोलो टायर्स पुणेचे विभागीय व्यवस्थापक राहूल सिंग आणि अपोलो टायर्स व्यवस्थापक (व्यवसाय विकास) आस्था वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व गटाच्या विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आले.