३ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर (लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)
मेष : तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामे मार्गी लावा. योग्य व्यक्तींचा उपयोग कामासाठी करा. पैशाचे व्यवहारात दक्ष रहा. नोकरीत अधिकाराचा वापर व मिळालेल्या सवलतींचा वापर योग्य ठिकाणी करा. बोलण्याने गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात वादविवादाचे प्रसंग आले तरी दुर्लक्ष करा. प्रिय व्यक्ती व मित्रमंडळींच्या भेटीचे योग येतील.
वृषभ : कार्यपद्धतीत बदल करून कामाचा दर्जा उंचावण्याकडे कल राहील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. पैशाची आवक चांगली झाल्याने नड भागेल. नोकरीत कामाचा सपाटा वाखाणण्याजोगा राहील. स्वत:च्या मनाप्रमाणे कामे कराल. घरात दोन पिढीतील तफावत वैचारिक मतभेद घडवून आणेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांनी सजग वृत्तीने घरातील कामे करावीत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे तंत आत्मसात करावे, यश हमखास मिळेल.
मिथुन : कामाचा उरक पडल्यामुळे हायसे वाटेल. व्यवसायात नवीन कामांकडे लक्ष पुरवाल. कार्यपद्धतीत बदल करून रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. ओळखीचा उपयोग करून तुम्ही तुमचा मतलब साध्य करून घ्याल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत हातातील कामे पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. कामात बदल हवा असल्यास त्यादृष्टीने हालचाल करा. घरात सुवार्ता कळेल. एखादी चांगली कामाची संधी चालून येईल. महिलांना कृतज्ञता वाटेल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.
कर्क : पूर्वी केलेल्या कामाचा लाभ या सप्ताहात मिळेल. भविष्यात उपयोगी पडणारी कामे हाती येतील. व्यवसायात रेंगाळलेल्या कामांना वेग येईल. सभोवतालच्या व्यक्तींचे मूड सांभाळून कामे पूर्ण करा. सरकारी कामात गती येईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. परदेशगमन, परदेशव्यवहारांच्या कामांना गती येईल. घरात आप्तेष्टांचे रुसवेफुगवे सहन करावे लागतील. तरी डोके शांत ठेवा. प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करा.
सिंह : कामाच्या पद्धतीत सहसा बदल केलेला तुम्हाला आवडत नाही. परंतु सभोवतालच्या परिस्थितीनुरुप कामात बदल करावा लागेल. त्यामुळे नवीन अनुभव मिळतील. व्यवसायात चौफेर नजर ठेवून स्पर्धेत टिकून राहण्याकडे कल राहील. काही गोष्टींत तडजोड करावी लागेल. पैशाची उलाढाल वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील.
कन्या : तुमच्या सुप्त गुणांना वाव देणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवाल. नवीन कामात पुढाकार राहील. सरकारी कामांना गती येईल. परदेशगमन, परदेशव्यवहारांच्या कामांना गती येईल. नोकरीत खुबीने कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात तात्विक मतभेद होतील.
तुळ : कामाचे नियोजन योग्य केले तर तणाव जाणवणार नाही व आनंदही घेऊ शकाल. व्यवसायात कामाचे प्रमाण भरपूर असेल. त्यामुळे समाधान वाटेल. मात्र कामाची पूर्तता वेळेत करणे बंधनकारक राहील. शब्द देताना विचार करा. पैशाची तरतूद कामी लागेल. नोकरीत ठरलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कष्ट कराल. मात्र वरिष्ठांच्या बदलत्या मुडमुळे तुमची कुचंबना होईल. घरात वैचारिक तफाववत जाणवेल.
वृश्चिक : तारेवरची कसरत करावी लागेल. तरीही त्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करून कामे सोपवा. विश्वासार्हता पडताळून नवीन कामाची जबाबदारी सहकाऱ्यांवर सोपवा. जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारी कामे स्वीकारू नका. नोकरीत नेहमीपेक्षा जास्त कामे करावी लागेल. त्यासाठी वरिष्ठ आवश्यक त्या सुविधा देतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.
धनु : कृतीशिलता वाढल्याने उत्साही राहाल. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. सर्व आघाड्यांवर पुढे जायचा विचार असेल. व्यवसायात कुठल्याही मार्गाचा अवलंब करून इच्छित साध्य करून घ्याल. पैशांची चिंता मिटेल. नवीन कल्पना विचार मनात येतील. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी लाभेल. नोकरीत नेहमीच्या काळात तुमची धाडसी वृत्ती दिसून येईल. लाभलेल्या कामांना गती येईल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळेल. घरात व्यक्तींना दिलेले आश्वासने पाळावे लागेल.
मकर : प्रगतीला पूरक ग्रहमान लाभले आहे. पूर्वी काही कारणाने लांबलेली कामे गती घेतील. व्यवसायात काही ठोस पावले उचलून त्याप्रमाणे कृती कराल. अनपेक्षित चांगली संधी चालून आल्याने उत्साही बनाल. जादा भांडवलाची गरज असेल. नोकरीत कार्यपद्धतीत बदल करून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. तुमचे विचार इतरांच्या माथी उतरवण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील. घरात वातावरण चांगले राहील. कुटुंबासमवेत प्रवासाला जाण्याचा योग.
कुंभ : योग्य दिशा सापडेल त्यामुळे कामांना गती येईल. व्यवसायात कामाचा वेग वाढवण्यासाठी काही ठोस पावले योजाल. खेळत्या भांडवलासाठी विशेष प्रयत्नशील रहाल, ओळखीचा उपयोग याकामी होईल. नोकरीत विचार व कृती यांची सांगड घालून कामाचे नियोजन करा, सर्वांशी सलोख्याचे संबंध राहतील, याची दक्षता घ्या. नवीन नोकरीचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. आळस झटकून आजचे काम आजच करा. विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवा.
मीन : चंचल मनाला आवर घालून व कामाचे नियोजन करून कार्यपद्धती ठरवावी लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यवसायात योग्य व्यक्तीची निवड योग्य कामासाठी करा. आर्थिक व्यवहारात काटेकोर रहा. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढेल. तरी झेपेल तेवढेच काम करा. घरात, कामात इतर व्यक्तींना प्रोत्साहन द्याल. तरुणांना नवीन संधी खुणावतील. महिलांनी छंद जोपासा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.