आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती : झोन यादी बनविण्याचे काम सुरू
पुणे – राज्य सरकारने हॉटेल, रेस्टो-बार सुरू करण्याचे आदेश बुधवारी दिले. “डाइन इन’ सेवाही 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कन्टेन्मेंट झोन वगळता शहरातील सर्व हॉटेल, रेस्टो-बार डाइनकरिता सुरू होतील. राज्य सरकारच्या आदेशानंतर कमीतकमी दोन-तीन दिवस आदेश काढायला लागतील.
“डाइन इन’चा आदेश शनिवारपर्यंत (दि.3) निघेल. तसेच, नव्या कन्टेन्मेंट झोनची यादी बनविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा आदेश काढला जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
राज्य सरकारने “डाइन इन’ला परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची बैठक हॉटेल प्रतिनिधींशी होणार असून यामध्ये मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा होणार आहे.
हॉटेल व्यावसायिक जवाहर चोरगे म्हणाले की, काम नसल्याने हॉटेल कर्मचारी घरी होते. शासनाने आदेश काढल्याने हा प्रश्न सुटणार आहे.
सागर कदम म्हणाले की, लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. यामुळे अनेक कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. आता, “डाइन इन’ सुरू होणार असल्याने दिलासा मिळणार आहे.