नगर -स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रस्तावांना महासभेने अखेर आज मंजुरी दिली. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी एक वाजता झालेल्या ऑनलाइन महासभेत या निवडींवर शिक्कामोर्तब झाले.
आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपमहापौर मालन ढोणे, नगरसचिव एस. बी. तडवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शिवसेना गटनेत्या रोहिणी शेंडगे, राष्ट्रवादीचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व उपमहापौर तथा भाजपच्या गटनेत्या मालन ढोणे यांनी आपापल्या पक्षांतर्फे नगरसेवकांची यादी महापौरांकडे बंद पाकिटात सादर केली.
त्यात शिवसेनेकडून मदन आढाव, संग्राम शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ऍड. राजेश कातोरे व विपुल शेटिया, तर भाजपकडून रामदास आंधळे यांच्या नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. छाननीत सर्वच अर्ज वैध असल्याचे घोषित करुन सर्वपक्षीय नगरसेवकांनी ही नावे मंजूर असल्याचा ठरावास अनुमती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारले; आयुक्तांनी स्वीकारले…!
स्वीकृत नगरसेवकपदासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांनी मागील महासभेत सुचविलेली सर्वच नावे तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नाकारली होती. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे बाबा गाडळकर यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यांचे निधन झाल्याने आता त्यांच्याऐवजी ऍड. राजेश कातोरे यांचे नाव राष्ट्रवादीचे सुचविले आहे.
त्यामुळे कातोरे वगळता पुन्हा तीच नावे सर्वपक्षीयांनी स्वीकृतसाठी प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे जी नावे तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नाकारली, तीच नावे आयुक्त मायकलवार यांनी स्वीकारलीत. सबब, पात्रतेच्या ज्या मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ती नावे नाकारली होती, त्या अटी व शर्ती यावेळी पूर्ण झाल्यात का? असा सवाल उपस्थित झाला आहे.