तळेगाव दाभाडे (वार्ताहर): पुणे येथे खासगी रुग्णालयात काम करणारी माळवाडी (ता. मावळ) परिसरात राहणाऱ्या एका परिचारिकेचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपत्ती निवारण कक्षप्रमुख तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी माळवाडी परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून यापूर्वी जाहीर केला आहे. त्यात इंदोरीचा समावेश करण्यात आला आहे. सोमवार (दि. 11) सायंकाळी 6 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत तहसीलदार बर्गे यांनी माहिती दिली.
पूर्वी तळेगाव दाभाडे परिसरात मिळून आलेली करोनाबाधित 34 वर्षीय महिला व सोमवार (दि. 11) रोजी माळवाडी (ता. मावळ) या परिचारिका एकाच रुग्णवाहिकेतून प्रवास करत होत्या. शनिवार (दि. 9) रोजी त्या महिलेच्या करोना असल्याचा अहवाल आला होता. मात्र त्या महिलेने माहिती दिली नाही. करोनाबाधित महिलेवर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचा पती व दोन मुलांवर औंध (पुणे) जिल्हा उप रुग्णालयात तपासणी करण्यात येत आहे.
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रसंगी मुख्याधिकारी दीपक झिंजाड, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे, डॉ. प्रवीण कानडे आदी उपस्थित होते.
कोरोनाबाधित 37 वर्षीय महिला ही माळवाडी ते पुणे येथील खासगी रुग्णालयात परिचारिका असल्याने दैनंदिन ये-जा करत होती. त्यामुळे तिच्या बरोबर असलेले तिचा पती व दोन मुलगे यांची तपासणी इतर सहकारी गाडीचे चालक यांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करून तसेच ती महिला ज्या ठिकाणी राहत आहे त्या परिसरातील तिच्या संपर्कातील व्यक्ती यांना क्वारंटाइन कक्षात ठेवण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
तळेगाव दाभाडे कंटेन्मेंटमध्ये आल्याने अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने व व्यवसाय बंद करण्यात येतील. अत्यावश्यक सेवा नागरिकांना कशाप्रकारे पुरविण्यात येणार आहेत याची माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड लवकरच सांगतील. तसेच तळेगाव दाभाडे कंटेन्मेंट घोषित केल्याने या ठिकाणाहून बाहेर जाणारे व बाहेरून आत येणारे व्यापारी व नागरिक, व्यावसायिक आदींची आरोग्य तपासणी करूनच ये-जा करण्याची परवानगी दिली जाईल, असे तहसीलदार बर्गे म्हणाले.
ग्रामीण व शहरी भागात जनता कर्फ्यू अथवा गाव बंदी करणारास पूर्ण सहकार्य केले जाईल. नागरिकांनी घरातच राहा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा मावळ तालुक्यातून पुणे शहरात जाण्याचे टाळावे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण फिरू नका.
– सुनील शेळके, आमदार
वैद्यकीय सेवेच्या नावाखाली मावळातून पुण्यात ये-जा करणाऱ्या डॉक्टर व नर्सवर बंदी घातली आहे. आतापर्यंत रुग्णालयात काम करणाऱ्या दोन नर्स करोनाबाधित झाल्या आहेत. कोणी माहिती लपवून ठेवल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
– मधुसूदन बर्गे, तहसीलदार