पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित
कराड (प्रतिनिधी) – जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूवर पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना देशभरात येत्या आठवड्यापासून प्रारंभ होणार आहे. या वैद्यकीय चाचण्यांसाठी भारतातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचा समावेश आहे. जगभरात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी कृष्णा हॉस्पिटलची निवड झाल्याने कराडचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर येणार आहे, अशी माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
धनुर्वात, गोवर, डेंग्यू यासारख्या आजारांवर लस शोधणाऱ्या पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी “कोडाजेनिक्स’च्या सहकार्याने फेब्रुवारी महिन्यात करोनावर लस विकसित करण्यास प्रारंभ केला. या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना “ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ची मान्यता मिळाली आहे. देशातील 40 निवडक संस्थांमध्ये होणाऱ्या या वैद्यकीय चाचण्यांसाठी गोव्यीाल प्रसिद्ध सीआरओएम क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल टुरिझम या एनएबीएच मान्यताप्राप्त संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.
सुसज्ज व अत्याधुनिक पायाभूत सुविधा, तज्ज्ञ स्टाफ, वैद्यकीय संशोधनाचा दीर्घ अनुभव या निकषांच्या आधारे कृष्णा हॉस्पिटलची या महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील संशोधक डॉक्टर या संशोधन कार्यात योगदान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चाचण्यांमध्ये पहिल्या टप्प्यात उच्च जोखीम गटात मोडणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस, खासगी सुरक्षारक्षक, भाजीपाला व फळ विक्रेते, किराणा माल विक्रेते यांचा अभ्यास केला जाणार आहे.
कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. सुजाता पाटील, डॉ. अपर्णा पतंगे व डॉ. सुजाता जाधव या प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. सीआरओएमचे संचालक डॉ. धनंजय लाड व डॉ. विजयकुमार पाटील हे सीरम इन्स्टिट्यूटच्यावतीने निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा उपयोग होणार आहे. वैद्यकीय चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही लस सामान्य लोकांसाठी उपलब्ध करण्याचा सीरम इन्स्टिट्यूटचा मनोदय आहे.