देहूरोड (वार्ताहर): कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील दोन अल्पवयीन मुलींनी करोनावर मात केली आहे. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. संबंधित मुलींच्या संपर्कातील व्यक्तींना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नेहरू मंगल कार्यालयात संस्थात्मक क्वॉरंटाइन केलेल्या 18 व्यक्तींना घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच चौदा दिवसही पूर्ण केल्याने संबंधित दोन्ही मुलींना घरी सोडण्यात आले आहे.
देहूरोड येथे गेल्या महिन्यात पुण्यातील येरवडा येथून एक कुटुंब आले होते. त्यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्यांच्या कुटुंबातील दोन मुलींचा (वय 5 व 11) करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना 29 तारखेला उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या 18 व्यक्तींना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या देहूरोड येथील नेहरू मंगल कार्यालयात उभारलेल्या संस्थात्मक क्वॉरंटाइन केंद्रात ठेवण्यात आले होते. तर उर्वरित 22 जणांना तपासणीनंतर निगेटिव्ह आले असताना घरीच क्वॉरंटाइन करण्यात आले होते.
दरम्यान करोनाबाधित दोन्ही मुलींची कॅन्टोन्मेंटच्या वैद्यकीय अधिकऱ्यांमार्फत येत्या 10 दिवस नियमित तपासणी करून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले आहे.