यमुनानगर परिसरातील महिला; बाधितांच्या संख्येतही वाढ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच मंगळवारी (दि. 21) उपचार सुरू असलेल्या एका 62 वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. ही महिला यमुनानगर (निगडी) परिसरातील रहिवाशी असून, संबंधित महिलेवर शहराबाहेरील रुग्णालयात करोनावरील उपचार सुरू होते. तर आज आणखी दोन रुग्णांची भर पडली असून त्यामध्ये एका 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे आता शहरातील बाधितांची एकूण संख्या 64 वर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 2 एप्रिलपासून रुग्ण आढळून आल्याने शहरातील वातावरण धोकादायक बनले आहे. दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण आणि मृतांचा आकडाही आता वाढू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मार्च महिन्यात आटोक्यात आलेल्या करोना बाधितांच्या संख्येने एप्रिलमध्ये वेगाने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात एका करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर आज पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दोनच दिवसांपूर्वी दोन संशयितांचाही मृत्यू झाला होता. मात्र महापालिकेने हे मृत करोना “निगेटिव्ह’ असल्याचे सांगितले होते.
यमुनानगर येथील एका 62 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात संबंधित महिलेवर करोना संदर्भातील उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला मधुमेह, रक्तदाब आणि किडनीचे दीर्घकालीन आजार होते, असे पालिका प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
तर मंगळवारी सकाळी 11 वाजता प्राप्त झालेल्या अहवालातून एका तरुणाला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण “वायसीएम’मध्ये दाखल असला तरी तो मूळचा वडगाव शेरी येथील आहे. तर सायंकाळी सात वाजता आलेल्या अहवालामधूनही एकाला करोनाची बाधा झाल्याने आज दिवसभरात दोन रुग्णांची भर पडली. एकूण बाधितांपैकी आजपर्यंत 18 रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी असलेल्या 8 बाधितांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील 2 रुग्णांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
72 जणांचे अहवाल प्रलंबित
करोना बाधितांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले तसेच संशयीत म्हणून उपचारासाठी दाखल झालेल्या 72 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याने बाधितांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 64 वर पोहोचली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून उर्वरित बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1518 जणांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासले असून त्यापैकी 1390 निगेटिव्ह आले आहेत.
पासची मुदत वाढविली
अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचारी, अधिकारी व इतरांच्या पासची मुदत बुधवारी (दि. 22) संपुष्टात येत असल्याने सर्व संबंधितांना नव्याने पास घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र नव्याने पाससाठी होणारी गर्दी व अडचण लक्षात घेऊन याच पासची मुदत 3 मे पर्यंत वाढवावी, अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जुन्याच पासची मुदत वाढविली असून सध्या असलेला पासच 3 मे पर्यंत ग्राह्य धरला जाणार आहेत. त्यामुळे नव्याने पास घेण्याची गरज नसल्याची माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.