बारामती – बारामतीकरांनो तुम्हाला घरात बसून खूप कंटाळा आला असेल तर ससून रुग्णालयात लोकांच्या सेवेसाठी तुम्हाला पाठवून देतो, असा सज्जड दम उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मंगळवारी (दि. 21) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 313 बारामती शहरातील “महाभागांना’ भरून त्यांची शाळा घेतली. पोलिसांच्या या “गुड मॉर्निंग’ पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या अतिउत्साही बारामतीकरांना आज पोलिसांनी आपला चांगलाच हिसका दाखवला. लॉक डाऊन काळात संचार बंदीचे उल्लंघन करून बिनधास्तपणे मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिला व पुरुषांसह 313 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. आज सकाळी पावणे सहा वाजता वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट लावून पोलिसांनी या नागरिकांना पकडले. यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिकांचा देखील समावेश आहे. या सगळ्यांना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर नेऊन त्यांच्याकडून योगासने करून घेतली.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शेलार, फौजदार पदमराज गंपले, सचिन शिंदे, रमेश भोसले यांच्यासह 50 कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला. या पुढील काळात आता मॉर्निंग वॉकसह इव्हिनींग वॉक करणाऱ्यांवरही पोलिसांची नजर असेल व या पुढील काळात कारवाईच केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहनही त्यांनी केले.
मी शपथ घेतो की…
अतिउत्साही व मॉर्निंग वॉकसाठी सुरुवातीला शाब्दिक फटके देत कारवाईचा धाक दाखवून नंतर समज देत त्यांनी जवळपास 313 जणांची मुक्तता केली. या पुढे लॉकडाऊन संपेपर्यंत घराबाहेर पडणार नाही अशी शपथ घ्यायला लावत त्यांना पहिली संधी म्हणून समज देऊन नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सोडून दिले. अनेक प्रतिष्ठितांनाही घराबाहेर पडू नका, असे सांगूनही ते ऐकत नसल्याने अखेर आज पोलिसांनी आपल्या भाषेत त्यांना समजून सांगितले.
“मला करोना होणार नाही, असे एकाने तरी सांगा’
पंतप्रधान, मुख्यमंत्री, पोलीस, प्रशासन तसेच सगळी माध्यमे घरात थांबा असे सांगत आहेत, ते तुम्हाला समजत नाही का? अनेकांनी तर मास्कही लावलेले नाहीत, तुम्हाला असे वाटत का की तुम्हाला करोना होणारच नाही? तुमच्यामधील एक जण तरी असा आहे की तो उठून सांगू शकेल की मी करोनाग्रस्तांसोबत फिरलो तरी मला करोना होणार नाही? नक्की अडचण काय आहे तुमची, का तुम्ही रस्त्यावर येता? तुम्हाला काय वाटत आम्ही मूर्ख आहोत का? या शब्दांत उपविभागीय अधिकाऱ्यांनी अतिउत्साही बारामतीकरांची सकाळी सकाळी शाळा भरवल्याने शहरात दिवसभर चर्चा रंगली होती.