पिंपरी – पुण्यातील ६० वर्षीय एका करोना बाधित रुग्णाचा पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ११) पहाटे घडली.
पुण्यातील कासेवाडी भागात राहणारा हा रुग्ण ५ मे रोजी काळेवाडीमधील आपल्या भावाकडे आला होता. भावाने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले. मात्र त्याची प्रकृती आणखी खालावली. त्यामुळे त्यास वायसीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत हा रुग्ण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत नऊ करोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत. त्यापैकी चार जण हे पिंपरी चिंचवड शहरातील आहेत. तर उर्वरित पाचजण शहराच्या हद्दीबाहेरील आहेत.