चौदा दिवसांनंतरचा तपासणी अहवाल; 30 संशयितांना लागण नाही
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाचे पहिले तीन रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आणखी एका रुग्णाचा चौदा दिवसानंतरचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाचा आणखी एकदा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. तसेच संशयित म्हणून दाखल केलेल्या तीस जणांचाही तपासणी निगेटिव्ह आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आठ दिवसांपूर्वी राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या होती. 12 मार्च रोजी पहिल्या तीन रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लागोपाठ 12 रुग्ण आढळल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र करोना विषाणूला रोखण्यात महापालिका प्रशासनाला यश येत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील पहिले तीन रुग्ण करोनामुक्त झाल्यानंतर चौथ्या रुग्णाचा अहवालही शुक्रवारी निगेटिव्ह आला. त्यानंतर दुसऱ्यांदा त्या रुग्णाच्या घशातील द्राव तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहे. तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णालाही घरी सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, करोनाचे संशयित म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम व भोसरी येथील रुग्णालयात दाखल झालेल्या 30 संशयितांचे तपासणी अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे, उर्वरित सहा करोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच गेल्या सात दिवसांमध्ये शहरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.