प्रकाश राजेघाटगे
खोंड दगावल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यासाठी विश्वस्तांनी केली मदत गोळा
पुसेगाव – सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या 72 व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगावचे येथे यात्रा भरली आहे. यानिमित्त विविध स्पर्धा व बाजार सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख यात्रा असल्याने भक्तांचा महापूर आहे. शेतकरी वर्गासाठी ही पर्वणी असते. येथील बैल बाजारात जनावरांची मोठी आवक होते. मात्र, या बाजारात बुध येथील शेतकऱ्याचे खोंड दगावल्याने त्याची अवस्था वाईट झाली होती. अशा वेळी लोकांमधील माणुसकी जागी झाली आणि देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रताप जाधव, रणधीर जाधव व बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी पुढाकार घेतल्याने अल्पावधीत पुरेशी मदत गोळा झाली.
रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बैल बाजारात बुध येथील शेतकरी दिनकर कुंभार यांचे 70 हजार रुपये किमतीचे खोंड सकाळी दावणीवर मृतावस्थेत आढळून आला. मागील दोन वर्षातील दुष्काळ व यंदाच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यचे जगणे मुश्कील झाले असताना खोंड विकून कुटुंबाची गुजराण करण्याची कुंभार यांची आशा मावळली. त्यांच्याकडे पाहून बाजारातील प्रत्येक जण हळहळला; पण लोकांमधली माणुसकी अजूनही जागी असल्याची प्रचिती आली.
कुंभार यांची अवस्था समजताच देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रताप जाधव, रणधीर जाधव व बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी मदत गोळा करण्याचे ठरविले. एका टॉवेलची झोळी करून त्यांनी यात्रा व बैल बाजारातून त्यांनी फेरी मारली. यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी सद्गुरू सेवागिरी महाराजांची झोळी आहे, असे मानून आपल्या कुवतीप्रमाणे दान केले आणि दोनच तासात झोळी भरली.
बैल बाजारातील शेतकऱ्यांनीही फिरून मदत गोळा केली. मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, प्रताप जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, सुरेश जाधव यांनीही मदतीची घोषणा केली. खरे तर सेवागिरी ट्रस्टमार्फत वर्षभर समाजोपयोगी कामे सुरू असतात; पण बिकट परिस्थितीत अडकलेल्या कुंभार यांनाही ट्रस्टने मदत केली.