देवसंस्थानच्या निर्णयाला विरोध : समाधीवरील भाविकांच्या महापूजा बंदची अंमलबजावणी
आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवरील भाविकांच्या महापूजा व अभिषेक शुक्रवार (दि. 27) पासून बंद करण्यात आले. तर मुक्ताबाई मंडपात माउलींच्या चल पादुकांवर आजपासून अभिषेक सुरू करण्यात आले आहे. मात्र, या देवसंस्थानच्या निर्णयावर ब्रह्मवृंदांनी नाराजी व्यक्त करीत चल पादूका पूजनावर बहिष्कार टाकला. तर मंदिरात ब्रह्मवृंद उपस्थित नसल्याने काळजीवाहू ब्राह्मण देवसंस्थानने उपलब्ध करून पूजेला प्रारंभ केला.
अलंकापुरी येथील माउलींच्या संजीवन समाधीवर होणाऱ्या भक्तांच्या महापूजा या शुक्रवार (दि. 27) पासून मुक्ताई मंडपात माउलींच्या चल पादुकांवर होणार असल्याचा एक धाडसी निर्णय देवसंस्थानने घेतला असल्याचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांनी गुरुवारी (दि. 26) सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.
त्याप्रमाणे आज सकाळी मुक्ताबाई मंडपात माउलींच्या चल पादुकांवर देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे आणि डॉ अभय टिळक यांच्या हस्ते पहिला अभिषेक करण्यात आला, त्यानंतर भाविकांचे अभिषेक सुरू करण्यात आल्या यावेळी मंदिरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भाविकांना संजीवन समाधीचे सुलभ दर्शन घेता यावे व समाधीची सतत होणारी झीज थांबावी यासाठी देवसंस्थानने प्रायायोगिक तत्त्वावर घेतलेला निर्णय सुस्त्य असल्याचे सांगून देवसंस्थानच्या या निर्यणाचे भाविकांनी स्वागत केले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर महापूजा बंद करण्याबाबत जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे
समाधीचे संवर्धन आणि पावित्र्य टिकवून राहील. जास्तीत जास्त भाविकांना सोयीस्कर आणि समाधानकारक दर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे ऍड. विकास ढगे यांनी सांगितले. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करावे तसेच सहकार्य करावे असे आवाहन विश्वस्त डॉ अभय टिळक यांनी केले.