साताऱ्यात पंचायत समिती रस्त्यावरील उबदार कपड्यांच्या विक्रेत्यांना मंदीचा फटका बसला आहे. जिल्हा परिषद मैदान परिसर व बॉम्बे रेस्टॉरंट चौकात स्वेटर विक्रेत्यांची गर्दी असली तरी ग्राहकांचा प्रतिसाद नाही. राजस्थान, दिल्ली, सूरत, ठाणे येथून वूलची आयात मंदावल्याने स्वेटरच्या किमती तीस टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सातारा – डिसेंबरमध्ये जाणवणाऱ्या थंडीचा “फील’ येईनासा झाल्याने उबदार कपड्यांना उठाव मिळेनासा झाला आहे. स्वेटर, मफलर, कानटोप्या, हातमोजे आदी उबदार कपडे व गारमेंटस् दुकानात व स्टॉलवर उपलब्ध असूनही त्यांच्या खरेदीकडे सातारकरांनी पाठ फिरविली आहे.
यंदा पावसाळा तब्बल दीड महिना लांबल्याने हिवाळ्यातील गारठा साताऱ्यात जाणवेनासा झाला आहे. पहाटे गार वारे जाणवत असले तरी थंडी जाणवत नाही. पश्चिम किनारपट्टीवर वारंवार कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे थंडी पडेनाशी झाली आहे.
साताऱ्यात पंचायत समितीच्या रस्त्यावर नेपाळी विक्रेत्यांकडे स्वेटर व मफलर खरेदीसाठी दर हंगामात गर्दी होते. मात्र, यंदा या हॉकर्स झोनमधील आठपैकी केवळ तीनच विक्रेते दुकाने उघडून बसले आहेत. डिसेंबर महिना संपत आला तरी या स्टॉलवर अभावानेच गर्दी होत आहे. स्वेटर विक्रेता आरिख तारिंग यांनी सांगितले की, स्वेटर खरेदीसाठी आता पूर्वीसारखी गर्दी होत नाही. स्वेटर विक्रीची उलाढाल सुमारे 25 लाख रुपयांची होती; परंतु गेल्या पाच वर्षांपासून या उलाढालीत घट होत आहे. स्पेशल वूल कोटस्, गुक्की व इतर ब्रॅंडस्च्या उबदार कपड्यांची आवक दिल्लीतून होते. आता साताऱ्यात स्वेटरच्या किमती बाराशे रुपयांवर पोहोचल्या असून ग्राहकांचा प्रतिसाद थंड आहे.
दिवसाकाठी एखाददुसऱ्या स्वेटरची विक्री होत आहे. मफलर, कानटोप्या व जॉगिंग ट्रॅकसूटची मागणी वाढली आहे. ब्रॅंडेड ट्रॅकसूट दीड हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. थंडी फारशी नसली तरी या हंगामात व्यायामाची सुरुवात करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ट्रॅकसूटला मोठी मागणी असल्याचे व्यावसायिक मोहित कटारिया यांनी सांगितले.