नगर (प्रतिनिधी) –सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली असून, पळून जाण्याच्या तयारीत असणार्या नराधमाच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. युसूफ हमीद कुरेशी (वय 34 रा. काटवन खंडोबा, नगर, मूळ रा. लासुरणे, ता.बारामती,जि पुणे) याला अटक करण्यात आली. न्यायालयाने 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलीची आई शहरात मोलमजुरीचे काम करते. आरोपी कुरेशी याने तीन ते चार दिवस अगोदर चिमुरडीला पाणीपुरी, चॉकलेट, चिप्स तसेच इतर खाण्याचे पदार्थ देऊन ओळख निर्माण केली. 31 ऑगस्टला पीडितेची आई कामावर गेली होती. याची संधी साधत कुरेशी याने चिमुरडीस दुचाकी गाडीवर बसवून त्याच्या कामाच्या ठिकाणी नेऊन अनैसर्गिक अत्याचार केला. यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा घडल्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाची दोन पथके तयार केली. आरोपी हा गुन्हा करून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती निरीक्षक शिंदे यांना मिळाली. त्यांनी तातडीने सदरचे दोन पथके रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात पाठविली. आरोपी हा आयुर्वेदिक कॉलेज ते काटवन खंडोबा रोडने नगर शहर सोडून जात असताना गुन्हे पथकाने त्यास पकडले.
त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखविताच त्याने युसूफ हमीद कुरेशी असे खरे नाव सांगितले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, मनोज महाजन, पोलीस हवालदार गणेश धोत्रे, शरद गायकवाड, पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, सागर पालवे, दीपक रोहकले, सुजय हिवाळे, अमोल गाडे, संदीप थोरात, सोमनाथ राऊत, तानाजी पवार व याकुब सय्यद यांनी केली. पोलीस उपनिरीक्षक महाजन तपास करत आहेत.