मुंबई – अमेरिकेने केलेल्या व्याजदर वाढीच्या घोषणेमुळे जागतिक शेअर बाजारात कमालीची अस्थिरता आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही खरेदी विक्रीच्या लाटा चालू आहेत. आज दिवसभर निर्देशांक अस्थिर राहिल्यानंतर बाजार बंद होताना निर्देशांक कालच्या पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 36 अंकांनी वाढून 58,803 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी तीन अंकांनी कमी होऊन 17,539 अंकावर बंद झाला.
रुपया घसरत असल्यामुळे आणि परदेशी गुंतवणूक परत जात असल्यामुळे देशातील गुंतवणूकदारांनी खरेदी वाढविण्याचे धाडस केले नाही. एचडीएफसी बॅंक आणि एचडीएफसी बरोबरच आयटीसी, लार्सन अँड टुब्रो, ऍक्सिस बॅंक, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बॅंक, स्टेट बॅंकेचे शेअर वाढले. मात्र मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बॅंक, नेस्ले, पावर ग्रीड, टाटा स्टील आणि इन्फोसिस या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी आज जाहीर होणार आहे. त्या आधारावर फेडरल रिझर्व्ह पतधोरणात निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष होते. त्याचबरोबर तेल उत्पादक देशाची संघटना या आठवड्यात बैठक घेणार आहे. जर या संघटनेने तेलाचे उत्पादन कमी केले तर तेलाच्या किमती वाढू शकतात. याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. सरलेल्या आठवड्यामध्ये सेन्सेक्स 30 अंकांनी तर निफ्टी 19 अंकांनी कमी झाला आहे.
विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारामध्ये शेअर निर्देशांक मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. त्या तुलनेमध्ये भारतीय शेअर बाजाराचे या आठवड्यात कमी नुकसान झाले. मात्र भारतीय शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली. कालच्या प्रमाणे आजही छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
भांडवली वस्तू, बॅंकिंग आणि ग्राहक उपयोगी वस्तू क्षेत्राचे निर्देशांक वाढले. तर धातू, ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू व रिऍल्टी क्षेत्राला विक्रीचा फटका बसला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज दोन टक्क्यांनी वाढून 94.22 डॉलर प्रति पिंप झाल्या. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराने 2,290 कोटी रुपयाचे शेअरची विक्री केली.