एनसीच्या शिष्टमंडळाने घेतली अब्दुल्ला पिता-पुत्राची भेट
श्रीनगर: काश्मीरमध्ये रविवारी दोन महिन्यांच्या खंडानंतर महत्वाची राजकीय घडामोड घडली. त्यानुसार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या फारूक आणि ओमर अब्दुल्ला या पिता-पुत्राची त्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
केंद्र सरकारने 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्या निर्णयानंतर तातडीने त्या राज्यातील बहुतांश राजकीय नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. फारूक यांना त्यांच्या श्रीनगरमधील निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर ओमर यांना सरकारी विश्रामगृहात ठेवण्यात आले आहे.
एनसीच्या जम्मूस्थित नेत्यांच्या हालचालींवरही निर्बंध घालण्यात आले होते. ते नुकतेच उठवण्यात आले. त्यानंतर एनसीच्या जम्मूस्थित नेत्यांच्या विनंतीवरून त्यांना जम्मू-काश्मीर प्रशासनाने अब्दुल्ला पिता-पुत्राची भेट घेण्याची परवानगी दिली. त्यानुसार, एनसीच्या जम्मूतील 15 नेत्यांच्या शिष्टमंडळाने अब्दुल्ला पिता-पुत्राची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्या भेटींमध्ये जम्मू-काश्मीरमधील घडामोडी आणि तेथील आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली.
नंतर शिष्टमंडळाने पत्रकारांशी संवाद साधला. अब्दुल्ला पिता-पुत्र व्यवस्थित आहेत. मात्र, ते जम्मू-काश्मीरमधील निर्बंधांवरून व्यथित आणि चिंताग्रस्त आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकशाहीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आणि राजकीय प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्व नेत्यांची सुटका केली जावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.