मावळातील ‘जनसेवक’ करोडोंचे धऩी !

रणसंग्राम : जॅग्वार, ऑडी अशा 26 वाहनांसह 28 कोटींचे सुनील शेळके मालक

  • बाळा भेगडेंची एकूण संपत्ती साडेसात कोटींची
  • रवींद्र भेगडेंची मालमत्ता 11 कोटींच्या घरात

पिंपरी – गेली 25 वर्षे मावळात विधानसभेच्या लढाईत भारतीय जनता पक्ष विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस (अपवाद 1995) अशी राहिली. भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले राज्यमंत्री बाळा भेगडे विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील शेळके यांच्यात प्रमुख लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. आता संपत्तीच्या बाबतीत सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांच्यावर मात केली आहे. त्यांच्या नावे 28 कोटींची संपत्ती आहे असून, त्यामध्ये जॅग्वार, ऑडी या अलिशान मोटांरीससह विविध 26 वाहनांचे मालक ते आहेत. तर बाळा भेगडे यांची संपत्ती साडेसात कोटी, तर भाजपचे बंडखोर रवींद्र भेगडे यांची 11 कोटींच्या घरात मालमत्ता असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले आहे.

मावळ विधानसभेसाठी भाजपकडून संजय ऊर्फ बाळा भेगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सुनील शेळके, बंडखोरी करीत भाजपचे रवींद्र भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बहुजन समाज पक्षाकडून मंदाकिनी शशिकांत भोसले, वंचित बहुजन आघाडीतर्फे रमेश ओव्हाळ, खंडू तिकोणे, दीपक लोहार, धर्मपाल तंतरपाळे, मुकेश अगरवाल, सारिका शेळके (सर्व अपक्ष) या 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त न झाल्याने भाजपचे गुलाब म्हाळसकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सारिका शेळके यांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले आहेत.

नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. यामध्ये सुनील शेळके मावळात सर्वाधिक “श्रीमंत’ ठरले आहेत. त्यांची मालमत्ता 28 कोटी 59 लाख 4 हजार 566 रुपये इतकी आहे. जंगम मालमत्तेमध्ये ऑडी, जॅग्वार या अलिशान मोटारींसह 26 वाहनांचा समावेश असून, 3 कोटी 43 लाख 3 हजार रुपयांची वाहने त्यांच्या मालकीची आहेत. विशेष म्हणजे 40 तोळे सोने, पाच किलो चांदी आणि हिऱ्याचे अलंकार आणि हिरेजडीत सोने असे कोटीच्या घरात मौल्यवान दागिने आहेत. तर 3 कोटी 35 लाखांची स्थावर संपत्ती त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.

याशिवाय राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर भाजपने सलग तिसऱ्यांदा विश्‍वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या गेल्या दोन टर्मचा विचार करता त्यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रातून दिसून येत आहे. त्यांचा शेती आणि उर्से येथील सम्राट इंजिनिअरिंग हा व्यवसाय आहे. त्यांची जंगम 67 लाख 5 हजार 344 इतकी आहे. तर शेतजमीन आणि खरेदी जमीन या स्थावरची 6 कोटी 89 लाख 36 हजार रुपये एवढी मालमत्ता आहे.

भाजपचे बंडखोर रवींद्र भेगडे यांची जंगम मालमत्ता 1 कोटी 74 लाख 56 हजार 377 रुपये, तर स्थावर संपत्ती 9 कोटी 40 लाख 81 हजार 463 अशी एकूण 11 कोटी 15 लाख 37 हजार 840 रुपये इतकी आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सारिका शेळके यांची 2 कोटी 65 लाख 50 हजार रुपये संपत्ती आहे. त्यामध्ये 2 कोटी 3 लाख 93 हजार रुपयांची जंगम
मालमत्ता आहे.

दहा वर्षात बाळा भेगडेंची मालमत्ता वाढली पाच पटीने –

भाजपचे बाळा भेगडे यांनी 2009 मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे उर्से आणि तळेगाव दाभाडे येथील वडिलोपार्जित 1 कोटी 38 लाख 46 हजार 37 रुपये आणि बिगरशेती 3 लाख 19 हजार 537 रुपये किंमतीचे शेतजमीन होती. त्यानंतर 2014 रोजी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात वडिलोपार्जित आणि खरेदीची मालमत्ता 2 कोटी 41 लाख 92 हजार रुपयांपर्यंत पोहोचली. त्यामध्ये जंगम मालमत्ता 26 लाख 21 हजार 465 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यात एका इनोव्हा मोटारीचा अधिकचा समावेश झाला आहे.

विशेष म्हणजे सन 2019 आणि 2014 मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 2019 मध्ये बाळा भेगडे यांची मालमत्ता थेट 7 कोटी 56 लाख 41 हजार 376 रुपयांवर गेली. यामध्ये वडिलोपार्जित शेतजमिनीचे मूल्य 1 कोटी 91 लाख 54 हजार 912 रुपये, तर खरेदी मालमत्ता 4 कोटी 97 लाख 81 हजार 120 रुपये झाली आहे. शेती आणि उद्योग हे त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत दाखविण्यात आले आहेत. म्हणजेच 2009 मध्ये बाळा भेगडे यांची स्थावर मालमत्ता 1 कोटी 41 लाख 65 हजार 574 रुपये होती. ती 2019 मध्ये साडेसात कोटींहून अधिक रुपयांची झाली आहे.

…आम्ही सारे लक्षाधीश –
बसपाच्या उमेदवार मंदाकिनी भोसले यांची जंगम 3 लाख 74 हजार रुपये, तर स्थावर मालमत्ता 18 लाख रुपये आहेत. अपक्ष खंडू तिकोणे यांची जंगम 1 लाख 60 हजार रुपये, तर स्थावर 1 लाख 11 हजार रुपये संपत्ती प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. शेती करणारे उमेदवार दीपक लोहार यांच्याकडे जंगम मालमत्ता अवघी 52 हजार रुपये असून, त्यात 46 हजार रुपयांच्या दुचाकीचा समावेश आहे. स्थावर मालमत्ता 61 लाख रुपये शपथपत्रात नमूद केली आहे.

मुकेश आगरवाल हे उमेदवार टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे असून, त्यांची जंगम आणि स्थावर अशी 62 लाख 97 हजार रुपये संपत्ती आहे. धर्मपाल तंतरपाळे यांची 1 लाख 75 हजार रुपये जंगम, तर 25 लाख रुपये स्थावर मालमत्ता आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश ओव्हाळ यांनी जंगम मालमत्ता 12 लाख 3 हजार 806 रुपये एवढी आहे. ओव्हाळ यांच्याकडे स्थावर मालमत्ता नाही. शेती आणि वकीली व्यवसाय दाखविलेल्या रमेश ओव्हाळ यांच्या मालमत्तेच्या अन्य सर्व स्थावर आदी रकान्यांमध्ये “नाही’ असा स्पष्ट उल्लेख आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.