बिहार (पाटणा ) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पाटणा येथे भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्यांच्या दोन दिवसीय सत्राचे अध्यक्षस्थान भूषवले. सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, 2024 मध्ये भाजप-जेडीयू एकत्र निवडणुका लढवतील, नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारांची चर्चा नेहमीच चर्चेत असते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पाटणा येथे झालेल्या भाजपच्या सातही आघाड्यांच्या पहिल्या संयुक्त राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपीय सत्राला संबोधित करताना शाह यांनी कार्यकर्त्यांना दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय यांसारख्या दुर्बल घटकांसाठी मोदींच्या राजकीय मोहिमेला बूथ स्तरावर पाठिंबा देण्यास सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, अमृत महोत्सवनिमित्त देशभक्तीची भावना पसरवण्यासाठी शाह यांनी कार्यकर्त्यांना 9 ते 12 ऑगस्ट असे चार दिवस समर्पित करण्यास सांगितले. सिंग म्हणाले, “पक्षाच्या कार्यकर्त्यांना 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यास आणि पंतप्रधान मोदींचे सलग तिसऱ्यांदा सत्तेत पुनरागमन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.” त्यांना गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.