Nellore cow । ब्राझील मधील जनावरांच्या लिलावामध्ये नेल्लोर जातीच्या गाईला अविश्वसनीय म्हणजे 48 लाख डॉलर एवढी किंमत मिळालेली आहे. रुपयाच्या भाषेत सांगायचे तर ही गाय तब्बल 40 कोटी रुपयांना विकलेली आहे. व्हायटीना 19 एफ वाय व्ही म्हणजेच मारा इमोविस या जातीची ही गाय आहे. बोलीभाषेत तिला नेल्लोर गाय म्हटले जाते. हे नाव आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यावरून पडले आहे.
जनावरांच्या लिलावाच्या इतिहासात या गाईच्या किमतीने एक विक्रम नोंदवलेला आहे. त्याचबरोबर जनावरांच्या उद्योग क्षेत्रात श्रेष्ठ वंशातील आणि श्रेष्ठ गुण असलेल्या जनावरांना किती मोल मिळू शकते हे या घटनेतून पुढे आलेले आहे. नेल्लोर जातीच्या गाई या पांढऱ्या शुभ्र असतात आणि त्यांना देखणे वशिंड असते. या गाईंचे मूळ भारतात आहे आणि आता या गाईंना ब्राझीलमध्ये अतिशय महत्त्व आलेले आहे.
या नेल्लोर जातीच्या गायीचा लिलाव ब्राझील मधील सावोपावलो येथील अरांदू येथे झाला. या जातीचे शास्त्रीय नाव बॉस इंडिकस असे असून तिचे मूळ भारतात आहे. ही गाय अतिशय काटक आणि कुठल्याही वातावरणाशी जुळवून घेण्यात समर्थ असल्यामुळे तिला मोठी मागणी आहे.
या नेल्लोर जातीच्या गाईंची जोडी 1868 मध्ये जहाजाद्वारे ब्राझील मधील साल्वादोर येथे आणण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन गाई १878 मध्ये आणण्यात आल्या 1960 नंतर मोठ्या प्रमाणावर अशा गाईंची आयात करण्यात आली. त्यातून मग या जातीच्या गाईंचा प्रसार ब्राझील भर झाला.
या गाई उष्ण हवामानातही टिकाव धरून राहू शकतात. त्यांची पचनक्षमता अतिशय कार्यक्षम असते. त्याखेरीज बांडगूळ म्हणून प्राण्यांच्या अंगावर जगणाऱ्या कीडे, कीटक आणि जिवाणूंचा सामना करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. त्यामुळे बहुतेक शेतकरी नेल्लोर जातीच्या गायींना प्राधान्य देतात.
आता या जातीच्या गाईला तब्बल 40 कोटी रुपयांची रक्कम लिलावात मिळालेली असली तरीही ही रक्कम मुळात त्या गायीच्या शुद्ध वांशिक गुणांसाठी देण्यात आलेली आहे, असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. आता या गाईपासून अधिक चांगल्या गाईंची उत्पत्ती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील आणि त्यातून अधिक चांगल्या गुणवत्तेच्या गाई निर्माण केल्या जातील. त्यामुळेच या गाईला लिलावामध्ये एवढी मोठी रक्कम मिळू शकलेली आहे.
ब्राझील मधील गाईंच्या एकूण संख्या पैकी 80% गाई या नेल्लोर जातीच्या असतात. या गाई कमी दर्जाच्या खाद्यावर देखील जगू शकतात आणि त्यांना सहजपणे गर्भधारणा होते. त्यामुळेच ब्राझील मधील शेतकरी नेल्लोर गाईंना प्राधान्य देतात.