कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टीवर तब्बल 380 विशालकाय अशा पायलट व्हेल माशांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. हे सर्व मासे पोहत पोहत टास्मानियाच्या किनारपट्टीवर आले होते पण येथील उथळ समुद्रात ते अडकले होते. त्यांना पुन्हा एकदा खोल समुद्रात न जाता आल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागल्याची बाब समोर येत आहे.
पायलट व्हेल प्रजातीतील हा मासा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. डॉल्फिन माशांच्या जातीतील या माशाचे वजन तीन टनपेक्षा जास्त आणि लांबी 23 फुटांपेक्षा जास्त असू शकते. टास्मानिया किनारपट्टीवरील मार्गी हार्बर नावाच्या एका प्रदेशांमध्ये एकूण 460 पायलट व्हेल मासे समुद्रात अडकले होते. त्यांना पुन्हा एकदा खोल समुद्रात पाठवण्यासाठी किनारपट्टीवरील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पण त्यामध्ये यश आले नाही आणि 380 माशांना आपला जीव गमवावा लागला.
या उथळ किनारपट्टीवर अजूनही 30 मासे जिवंत असून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहे.त व्हेल माशांचा एवढा मोठा समूह खोल समुद्र सोडून टास्मानियाच्या किनारपट्टीवरील उथळ प्रदेशात का आला याचा शोध आता अधिकारी घेत आहेत. या किनारपट्टीवरील सुमारे दहा किमी किलोमीटर क्षेत्रांमध्ये हे सर्व मासे आले होते. या प्रदेशातील समुद्राचे पाणी अतिशय थंड असल्याने बचाव कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.