मुंबई – ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्याविरोधात ईडीने समन्स बजावले आहे. या आठवड्यात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी यापूर्वी ईडीने दिनेश बोभाटे यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
मिळकतीपेक्षा 36% बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप दिनेश बोभाटे यांच्यावर आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमवल्याचा आरोप सीबीआयकडून करण्यात आला आहे. सीबीआयने दिनेश बोभाटे यांच्या विरोधात 17 जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला होता. दिनेश बोभाटे 2013 ते 2023 दरम्यानच्या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून काम करत होते.
या दरम्यान त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना जवळपास 36 टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयने या प्रकरणी दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नी देवश्री बोभाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
या दाम्पत्याने जवळपास 2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. त्यामुळे दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. आता अनिल देसाईंच्या पीएच्या अडचणीत वाढ झाली आहे. हे दोघेही आता सीबीआयसह ईडी चौकशीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाचे अनेक रडारवर
ऐन निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, आमदार राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब यांच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे.