राज्यातील घडामोडीत पक्ष नेतृत्वाला दिली साथ : निर्णय ठरणार महत्त्वपूर्ण
पुणे – राज्यात गेली महिनाभर सुरू असलेल्या सत्तानाट्यावर पडदा पडण्याची वेळ झालेली असताना अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडल्याचे वादंग उठले. यामुळे शरद पवार विरूद्ध अजित पवार, असे नवे नाट्य सुरू झाल्याने पक्षाच्या 54 आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरू लागली. साहेबांच्या बाजुने किती आणि दादांच्या मागे किती? यावर चर्चा झडत असताना अजित पवार यांच्या मागे गेलेले काही जण पुन्हा राष्ट्रवादीत परत आले. हे सगळं काही घडत असताना पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच्या सर्व म्हणजे 9 आमदार हे शरद पवार यांच्याच मागे ठामपणे उभे राहणार असल्याने त्यांचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी दि. 21 ऑक्टोबरला मतदान झाले. त्याचे निकाल दि. 24 ऑक्टोबरला हाती आल्यानंतर पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 11 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवल्याने जिल्ह्यावर राष्ट्रवादीचीच एकहाती सत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार जिल्ह्यात निवडून आल्याने जिल्ह्यावर राष्ट्रवादीचेच अर्थातच पवारांचे वर्चस्व असल्याचे विरोधकांनीही मान्य केले.
त्यानंतर गेल्या महिनाभरात झालेल्या सत्तानाट्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरत होती. परंतु, अजित पवार यांनी केलेले बंड, राजकारण फिरविणारे ठरले. काही आमदारांना बरोबर घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथही त्यांनी घेतली. यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटला असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. परंतु, अजित पवार यांच्या मागे गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतल्याने राजकारणाने कलाटणी घेतली आहे. यातून अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचे काय? राज्यात सत्ता नेमकी कोणाची? हे सर्व प्रकरण आता
सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले असले तरी पुणे जिल्ह्यातील आमदारांनी मात्र एकाच साहेबाचा आदेश पाळला आहे. तो म्हणजे शरद पवार यांचा आदेश.
जिल्ह्यातील आमदार पडताळून पाहता इंदापुरातून निवडून गेलेले आमदार दत्तात्रय भरणे यांची राजकीय कारकीर्द साखर कारखान्याचे अध्यक्ष, जि.प. अध्यक्ष ते आमदार अशी राहिली आहे. पवार यांनी भरणे यांना वेळोवेळी नव्या पदांवर संधी दिली आहे. तसेच, शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या राजकीय वाटचालीतही पवार यांचे मोठे योगदान आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांची राजकीय वाटचालच पवार यांनी आखून दिलेल्या मार्गावर झाली आहे. तालुका पातळीवर विविध पदांच्या माध्यमातूनही मोहिते यांचे नेतृत्व उभारी घेण्यात पवारांचा वाटा मोठा आहे. आंबेगावचे नेतृत्त्व म्हणून शरद पवार यांच्या पाठिंब्यावरच दिलीप वळसे पाटील पुढे आले आहेत.
तालुकाच नव्हे तर राज्यपातळीवरही वळसे पाटील यांचे नेतृत्त्व पुढे आणण्यात आले. पक्षातील महत्त्वाचे नेते म्हणून पाटील यांना कायमच पवार यांनी पुढच्या फळीत स्थान दिले आहे. जुन्नरमधील बेनके कुटुंबीयांचे राजकारण पवार यांच्यापासून सुरू झाले. बेनके कुटुंबीयांशी पवार यांचा असलेला घरोबा त्यातून वल्लभ बेनके आणि त्यानंतर अतुल बनके यांची आमदारकी, ही पवार यांचीच देणं असल्याचे मानले जाते. मावळात अन्य नेतृत्वाचे वारे वाहत होते. गेल्या 25 वर्षांत मावळमध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलत होते, अशावेळी सुनिल शेळके यांना संधी दिली जावी, असा पवार यांचा आग्रह होता. शेळके यांच्यासाठी पवार स्वत: प्रचार सभा घेतली आणि शेळके यांच्या रूपात मावळात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पहिला आमदार मिळवून दिला.
शहरातील मतदारसंघात येणारा हडपसर मतदार संघही विरोधकांच्या ताब्यात गेलेला असताना पवार यांनी त्यांचे राजकारणातील जुने सहकारी स्व. विठ्ठल तुपे यांचे चिरंजीव चेतन तुपे यांना संधी दिली. राजकीय स्थित्यंतरात पवार आणि तुपे हे अनेकदा एकत्र राहिलेले आहेत. राष्ट्रवादीत कार्यरत असताना विठ्ठल तुपे यांना पवार यांनी विविध माध्यमातून सातत्याने मदत केली. यावेळीही हडपसरमधून त्यांचे चिरंजीव चेतन तुपे यांना निवडून आणण्यात पवार यांनी मोठे प्रयत्न केले. वडगाव शेरीतून सुनिल टिंगरे तसेच पिंपरीतून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून आलेले अण्णा बनेसोडे यांच्या विजयातही शरद पवार यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. याच कारणांतून जिल्ह्यातील एकही आमदार शरद पवार यांच्या बरोबर ठाम उभा राहिला असल्याचे स्पष्ट होत आहे.
पवारांच्या आदेशाला आजही तेवढाच मान
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या विकासात शरद पवार यांचे सहकाराच्या म्हणजेच साखर कारखाने, दूध संस्था, शैक्षणिक संस्था यासह विविध माध्यमातून योगदान राहिलेले आहे. संस्थावरील अध्यक्ष पदे, सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य ते आमदारकीपर्यंत अशी राजकीय संधी दिली गेल्याने अनेक तालुक्यात राजकीय घराणी मोठी झाली असल्याने पवार यांच्या आदेशाला आजही तेवढाच मान दिला जात आहे. यातूनच राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर त्या-त्या मतदारसंघात निवडून आलेले आमदार पवार यांच्यासोबत ठाम उभे राहिले आहेत.