रात्री तयार झालेले सरकार रात्रीच जाईल -जयंत पाटील

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आता सरळ सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. काल या प्रकरणावर कोणातही तोडगा न काढता न्यायालयाने आज सत्तास्थापनेसाठी सादर केलेली कागदपत्रे न्यायालयात सादर करावी असे आदेश दिले होते. त्यात प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीत मंत्रीपदं वाटपाबाबत चर्चा झाली असल्याची शक्‍यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. तर या भेटीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा सर्व प्रकरा हास्यस्पद असल्याचे म्हटले आहे, शिवाय त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या भेटीची एकप्रकारे खिल्ली उडवल्याचे दिसून आले.

उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढं मोठं हे मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे त्या दोघांशिवाय एकमेकांना भेटायला त्यांच्याकडे कुणीच नाही, म्हणून ते दोघच एकमेकांना भेटणार. त्यामुळे त्या दोघांनी काय चर्चा केली, हे बाहेर माहिती नाही. परंतु आमदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी खातेवाटपाची चर्चा असं दाखवलं जातं आहे. तुम्ही दोघंच आहात, अद्याप मंत्री केलेले नाहीत, तर खातं कुणाला वाटणार? त्यामुळे हा सर्व प्रकार हास्यस्पद सुरू आहे. रात्री तयार झालेलं सरकार हे रात्रीच कधीतरी जाईल. याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.