पुणे – विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी पुण्यातील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले. पुण्यातील कार्यक्रमांबाबत दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून, सकाळी अचानक कार्यक्रम रद्द केल्याने अजित पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय रंगली.
दरम्यान, यामुळे सोशल मीडियावर पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर स्वत: पवार यांनीच “समृद्धी महामार्गावरील अपघातात झालेला प्रवाशांचा मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर दुःखाचं वातावरण आहे. अशा दुःखद मनस्थितीत कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहणं मला शक्य नाही. मी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत,’ असा खुलासा केल्यानंतर या चर्चेवर पडदा पडला.
पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांचा एक कार्यक्रम शनिवारी पुण्यात होणार होता. त्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता स्वत: अजित पवार उपस्थित राहणार होते. तर त्यानंतर सकाळी 11 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिरातही कार्यक्रम होता. त्यानंतर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत “एक तास राष्ट्रवादीसाठी’च्या बैठकांना ते उपस्थित राहणार होते. मात्र, सकाळी आमदार लाड यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अचानक अजित पवार उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर ते पुढील कार्यक्रमांना उपस्थित राहतील अशी चर्चा होती. मात्र, अजित पवार यांनीच यावर खुलासा केला.