पुणे – पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी तीन दिवसांत निलंबनाची दुसरी मोठी कारवाई केली आहे. वारजे पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, गुन्हे निरीक्षक दत्तराम बागवे यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी, अशा सात जणांना एकाच दिवशी निलंबित करण्यात आले आहे. या वाहन तोडफोडीचे सविस्तर वृत्तांकन दै. “प्रभात’ने केले होते.
पोलीस निरीक्षक दगडू हाके, दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, यशवंत पडवळे, जर्नादन होळकर, कर्मचारी सचिन कुदळे, अमोल भिसे यांना निलंबित करण्यात आले आहे. वारजे परिसरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारांनी धुडघूस घातला आहे. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केलेला गोळीबार आणि त्यानंतर पपुल्या वाघमारे व त्याच्या साथीदारांनी वाहनांची केलेली तोडफोड हे दोन्ही प्रकार निलंबन करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भोवले आहे.
वारजे-सहकारनगर तोडफोडप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यांचे 14 पोलीस अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले आहेत. पपुल्या याच्यावर मोक्का अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, या सर्वांनी मोक्का कारवाई करण्याबाबत सकारात्मकता दाखविली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत दिसून आले. पपुल्या याच्यावर वेळीच कारवाई झाली असती तर तोडफोडीची घटना टाळता आली असती, त्याचाच ठपका ठेवत सर्वांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
धडक कारवाईचा धडाका…
याप्रकरणी गुरुवारी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक एकनाथ शेंडगे, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, मारुती वाघमारे, अंमलदार जयराम पोटकुले, विनायक जांभळे यांना निलंबित करण्यात आले होते. यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांचे पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. यानंतर सदाशिव पेठेतील पोलीस चौकी बंद असल्याप्रकरणी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.