अजितदादा पुण्यावर प्रसन्न…! जिल्ह्यातील प्रकल्पांना निधी

 पुणे-नाशिक रेल्वे मार्गालाही प्राधान्य

पुणे – राज्याच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा रिंगरोड आणि पुरंदर विमानतळ या तीन प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत या प्रकल्पाच्या कामास सुरुवात होणार आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हे तीनही प्रकल्प महत्त्वाचे असून यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. यामुळे दादांच्या या “बजेट’बाबत जिल्ह्यातील नागरिकांनी, पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प : पुणे-नगर-नाशिक या जिल्ह्यांतून जाणाऱ्या या 235 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी 16 हजार 39 कोटींची आवश्‍यकता आहे. एका बाजुला भूसंपादनाची सर्व तयारी झाली असताना दुसऱ्या बाजुला या प्रकल्पासाठी निधीची तरतूद झाल्याने हा रेल्वे प्रकल्प वेगाने पुढे जाणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे.

एमएसआरडीसी रिंगरोड : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोडचा प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्व व पश्‍चिम असे या रिंगरोडचे भाग आहेत. या रिंगरोडची लांबी 170 किलोमीटर असणार आहे.

पुरंदर विमानतळ : पुरंदर तालुक्‍यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्यस्थितीत विमानतळासाठी आधी जाहीर करण्यात आलेल्या गावांमधील शेतकऱ्यांचा विरोध पाहून विमानतळासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्यात आला. नवीन जागेचा तांत्रिक व आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.