गृहिणी, उद्योजिका ते आरोग्य सभापती संपदाताई सांडभोर यांच्या कार्याला सलाम

“जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’ अशी म्हण पूर्वापार काळापासून आहे. याच म्हणीला अनुसरून कुटुंबासोबतच संपूर्ण राजगुरूनगरवासियांचे आरोग्य सांभाळणाऱ्या संपदाताई अमोल सांडभोर. एक सामान्य गृहिणी, व्यावसायिक ते आरोग्य सभापतिपपद भूषविणाऱ्या संपदाताई यांच्या कार्यावर दैनिक “प्रभात’ने टाकलेला फोकस…

संपदाताई सांडभोर यांचे शिक्षण बारावीपर्यंत आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयात झाले. त्यानंतर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात बीसीएस (कॉम्प्युटर सायन्स) पदवी घेतली. पुढे सॉफ्टवेअर टेस्टिंगची पदवी घेतली. 12वी नंतरचे उच्च शिक्षण सासरी आल्यानंतर पूर्ण केले. यात त्यांना पती अमोल यांची मोठी साथ मिळाली.

कॉलेज पूर्ण झाल्यानंतर काही काळ नोकरी केली, त्यानंतर राजगुरूनगर शहरातील मुंबई माता बाल संगोपन केंद्रात को ऑर्डिनेटर म्हणून काही काळ काम केले. नोकरीत चाकोरीबद्द जीवन असते. नोकरीत समाधान मिळाले नाही म्हणून त्या व्यवसायात उतरल्या. पती अमोल यांच्यासोबत व्यवसाय करण्यास सुरुवात केली. शिक्षणाचा उपयोग व्यवसायात केला त्यात सांडभोर दाम्पत्य यशस्वी झाले. “पारस कलेक्‍शन’च्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारच्या व्हरायटीचे शोरूम सुरु केले. याबरोबरच पूर्वीचे “अमर मॅचिंग सेंटर’च्या माध्यमातून व्यवसाय सुरू आहे.

पती अमोल सांडभोर यांच्यासह भाजपचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख मार्गदर्शनाखाली सामाजिक, राजकीय क्षेत्राची आवड असल्याने राजकारणात प्रवेश केला. नेतृत्वाचे गुण असल्याने राजगुरूनगर नगरपरिषदेची पहिली निवडणूक लढवली. आणि नगरसेविका म्हणून पहिल्यांदाच भरघोस मतांनी मतदारांनी त्यांना निवडून दिले. निवड झाल्यानंतर पहिल्या आरोग्य समिती सभापतिपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी तब्बल चार वर्षे आरोग्य समिती सभापती पद भूषवले. या कालावधीत सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले.

करोना काळात बजावली महत्त्वाची भूमिका
सामाजिक भावनेतून संपदाताई यांनी करोना काळात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वतः 2000 मास्क शिवून ते पोलीस, पत्रकार, आरोग्य कर्मचारी नगरपरिषद कर्मचारी, आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना मोफत वाटप केले. गरजू गरीब कुटुंबासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून किराणा किट वाटप कार्यात योगदान दिले आहे. वारकरी आणि आध्यात्मिक कुटुंबातील त्यांचा जन्म. माहेर आणि सासरच्या पाठिंब्याने आणि दोन्ही कुटुंबाच्या संस्काराच्या जोरावर व्यावसायिक सामाजिक, राजकीय जीवनात त्या यशस्वी झाल्या आहेत. हे सर्व करत असतांना कुटुंब आणि कर्तव्याशी कधीच तडजोड न करता आध्यात्मिक विचार आणि संस्कृती या सर्वांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

स्वच्छ स्वर्वेक्षणात सर्वोच्च बहुमान
राजगुरूनगर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीच्या सभापिपदावर संपदाताई असताना राजगुरूनगर शहरात सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले. विशेष म्हणजे याबाबत राजगुरूनगर नगरपरिषदेला उत्कृष्ट काम केल्याबाबत एक कोटी रुपयांचे बक्षीस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाले. हा सन्मान नगरपरिषद आणि संपदाताई सांडभोर यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च बहुमान आहे.

महिलांच्या न्याय हक्‍कासाठी…
संपदाताई सांडभोर या हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनच्या संचालिका असून खेड पोलीस ठाण्यामधील महिला सुरक्षा समिती, महिला दक्षता समिती यांच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. महिलांचे शैक्षणिक व आर्थिक सबलीकरण व्हावे यासाठी त्या कायमच प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी एका सामाजिक संस्थेची निर्मिती केली असून त्याद्वारे संपदाताईने काम सुरू केले आहे. बचत गटांना प्रोत्साहन देणारे उपक्रम त्याचबरोबर महिलांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करीत आहेत.

“त्यात’ महत्त्वाची भूमिका
नगरपरिषदेचा प्रथम शहर विकास आराखडा नियोजन समितीमध्ये संपदाताई सांडभोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात शहरातील नागरिकांचा दृष्टीकोन समोर ठेवून काम केले. आरोग्य सभापती असताना शहरातील कचराप्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. सार्वजनिक ठिकणी असलेल्या कचराकुंड्यांवर “गार्बेज टू गार्डन’ ही संकल्पना राबविली. शहरात वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम घेतले.

“त्या’ योजना आज पूर्णत्वाकडे
राजगुरूनगर शहरातील चासकमान धरणातून झालेली पाणी, भुयारी गटार योजना अंमलात आणण्यासाठी सर्व नगरसेवकांबरोबर काम केले. स्थायी समितीवर सदस्य असल्याने या योजनांचा पाठपुरावा केला. आज या योजना पूर्णत्वाकडे आहेत. या योजना सुरू असताना त्यात अनेक अडथळे आले; मात्र सामंजस्याने त्यावर मार्ग काढत ता अडचणींवर मात केली.

16 घंटागाड्या केल्या उपलब्ध
शहरातील कचरा व्यवस्थापनाचे अनेक प्रश्‍न असताना त्यावर मात करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून 16 घंटागाड्या उपलब्ध केल्या. ओला, सुकाकचरा ही संकल्पना राबविली त्याचबरोबर प्रबोधनपर कार्यक्रम घेतले. शहरात स्वछता रॅली काढून जनजागृती कार्यक्रम हाती घेतले. ते यशस्वी केले. गणपती उत्सव काळात नदी स्वच्छता अभियान राबवले. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले. भीमानदीमधील जलपर्णी काढण्यासाठी सेवाभावी सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी शहरात प्लॅस्टिक बंदीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलत कठोर निर्णय घेत शहरात प्लॅस्टिक बंदी केली.

शब्दांकन
रामचंद्र सोनवणे,
खेड तालुका प्रतिनिधी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.