राहुरी : देशभरात रामलल्ला महोत्सव भक्तीपूर्ण व जल्लोषात साजरा होत असतानाच राहुरीतील विविध कार्यक्रमात विविध राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. अनेक गावांतील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजकीय नेत्यांची बरीच धावपळ उडाली.
माजी आमदार शिवाजी कर्डिले, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी विविध कार्यक्रमात हजेरी लावली. गावोगाव असणारे या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी नेतेमंडळींची बरीच धावपळ झालेली दिसली.
आमदार प्राजक्त तनपुरे नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते. कानिफनाथ चौकातील श्रीराम मंदिरातील आरतीत त्यांचा सहभाग होता. बालाजी मंदिरातील श्रीराम लल्ला महोत्सवातही ते सहभागी झाले.दक्षिणमुखी मारुती मंदिरालाही त्यांनी भेट दिली. तांभेरे येथील ग्रामदैवत श्रीरामा महोत्सवातही ते सहभागी झाले होते. सडे येथे आज नवीन मंदीरात प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यालाही प्राजक्त तनपुरेंची हजेरी होती.
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दरेवाडी व कापूरवाडी येथील प्रभू श्रीराम मूर्तीची पूजा केली. बुऱ्हाणनगर येथील कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्याआधी रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर निळवंडे कालवा पाणी सोडण्याचा चाचणीचा शुभारंभप्रसंगी ते हजर होते.
देवळाली प्रवरामधील प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीचा माजी आमदार चंद्रशेखर कदम व त्यांच्या पत्नी प्रियतमा कदम यांच्याहस्ते अभिषेक झाला. त्यांच्या हस्ते देवळालीप्रवरा येथे कार सेवकांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व त्यांचे सहकारी नगरसेवक यात सहभागी झाले होते. राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे हे राहुरी बाजार समितीतील कार्यक्रमात सहभागी झाले होते. माजी नगराध्यक्ष डॉ. ऊषाताई तनपुरे यांनी साईबाबा मंदिरात रामलल्ला मूर्ती सोहळा कार्यक्रमास हजर होत्या. तसेच राहुरी न्यायालय परिसरातील मिरवणुकीत त्या सहभागी झाल्या.मल्हारवाडीरोड शिक्षक काॅलनीतील सोहळ्यासही त्यांची हजेरी होती.