अजित पवार गुरुवारी पुन्हा कोणाला टार्गेट करणार का?
मंगेश रत्नाकर
नारायणगाव – राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दोनदा भेट दिली तर त्यांचे पुतणे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (दि. 25) जुन्नर तालुक्यात येणार आहे. त्यामुळे शिवजन्मभूमी असलेला जुन्नर तालुका एकाच महिन्यात होत असलेल्या काका पुतण्यांच्या भेटीने ढवळून निघाला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या घोषणा लवकरच होण्याची शक्यता असल्याने अजित पवार पुन्हा खासादर डॉ. अमोल कोल्हे यांना टार्गेट करणार की आणखी काही बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
नारायणगाव येथील गणेश वाघ यांच्या हस्ताई ग्रो प्रोड्युसर कंपनीचे व पिंपळवंडी येथील यशवंत नागरी पतसंस्थेचे उद्घाटन तसेच शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने गुरुवारी (दि.25) येत आहेत. दरम्यान, शरद पवार दोनदा जुन्नर तालुक्यात येऊन गेले आहेत. आता अजित पवार येत असून कार्यकर्ते आपली ताकद वाढविण्यासाठी नेत्यांच्या पुढे शक्तीप्रदर्शन करीत असल्याने गुरुवारी अजितदादा गटाचे शक्तीप्रदर्शन जोरदार होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
खासदारकीचे काय होणार?
लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून जुन्नर तालुका शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असल्याने सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे प्रतिनिधित्व करीत आहे;परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निवडणुकांचे गणिते बदलली आहेत. अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हे निवडून कसे येतात तेच बघतो असे आव्हान दिले आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे यांना लोकसभेची निवडणूक सोपी जाणार नाही हे सांगण्यासाठी एखाद्या भविष्यकाराची आवश्यकता नाही. त्यामुळे शरद पवार पुन्हा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देणार की नवीन उमेदवार देणार याची उत्सुकता आहे.
अजित पवारांसमोर आढळराव पाटलांसह भाजपाचे आव्हान
राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीचा सत्ता असून शिरूर लोकसभा मतदारसंघ आपणच लढवणार असे अजित पवार यांनी जाहीर केले; परंतु सध्या तरी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोर माजी खासदार आढळराव पाटील तगडे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. परंतु आढळराव पाटील शिवसेना (शिंदे) गटात आहेत. तर भाजपही आपला उमेदवार देण्याची रणनीती आखत आहेत. अशावेळी अजित पवार यांच्यासमोर आढळराव पाटील शिवसेना (शिंदे गट) व भाजपाचे आव्हान आहे हे विसरून चालणार नाही.
सत्यशील शेरकर यांची भूमिका गुलदस्त्यांतच
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याला भेट देत असताना श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या घरी भेट देऊन राजकारणातील संभ्रमावस्था निर्माण केली. त्यामुळे काँग्रेस विचारांचे सत्यशील शेरकर ऐन निवडणुकांच्या तोंडावर काय भूमिका घेतात हे बघावे लागेल. सत्यशील शेरकर आपण कोणत्याही निवडणुकांसाठी उमेदवार नसल्याचे सांगत असले तरी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने संधी दिल्यास श्री विघ्नहर सहकारी कारखान्याचा विचार करून राजकारणातील बदलाचा आपल्यावर काय परिणाम होईल याचा विचार करून निर्णय घेतील का, असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.
आमदार बेनके यांना भूमिका घ्यावी लागेल
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आपण तटस्थ असल्याचे सांगितले आहे; परंतु तालुक्याचा विकास करायचा असेल तर त्यांना अजित पवार गटासोबत असणे अपरिहार्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना आपण शरद पवार की अजित पवार गटासोबत आहोत हे लवकरच स्पष्ट करावे लागेल.
आमदार बेनके यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर फाटा फूट झालेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून भविष्यातील तालुक्याच्या विकासाची भूमिका समजावून द्यावी लागेल. त्यानंतर आपण ज्या गटासोबत आहोत त्या गटासोबत कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी व त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी पुढील काही महीने कालावधी मिळू शकेल. आमदार बेनके यांनी ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आपण कोणत्या गटात आहोत हे सांगितले तर कार्यकर्त्यांना समजावून देण्यासाठी त्यांना पुरेसा कालावधी मिळणार नाही.