नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी न करणाऱ्या राज्य सरकारांना बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावल्यानंतर बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
देशभरातील करोना परिस्थितीवर बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अनेक विरोधी शासित राज्यांमध्ये इंधनाच्या चढ्या किमतींचा संदर्भ देत पंतप्रधानांनी हा अन्याय असल्याचे म्हटले होते. तसेच राज्य सरकारांनी सर्वसामान्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय हितासाठी’ VAT मध्ये कपात करावी असेही पंतप्रधान मोदींनी सुचवले होते.
पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्क कमी केले असले तरीही, अनेक राज्यांनी व्हॅट कमी करण्याच्या त्यांच्या विनंतीला मान्यता दिली नाही. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड आणि तामिळनाडूची नावेही घेतली.
पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यावर आता बिगर भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे
पंतप्रधानांना लाज वाटली पाहिजे – के. चंद्रशेखर राव
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी गुरुवारी सांगितले की, राज्यांना कर कमी करण्यास सांगताना पंतप्रधानांना लाज वाटली पाहिजे. ते म्हणाले की 2015 पासून त्यांच्या राज्यात इंधन करात कोणतीही वाढ झालेली नाही.
केसीआर म्हणाले, “राज्यांना सांगण्याऐवजी केंद्र कर का कमी करत नाही…? केंद्राने केवळ करच वाढवला नाही, तर उपकरही वसूल केला… हिम्मत असेल तर सांगा कर का वाढवले?”
नरेंद्र मोदी यांचे पूर्णपणे एकतर्फी आणि दिशाभूल करणारे भाषण – ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने गेल्या तीन वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवर अनुदान देण्यासाठी 1,500 कोटी रुपये खर्च केले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे एकतर्फी आणि दिशाभूल करणारे भाषण केले… त्यांनी मांडलेले तथ्य चुकीचे आहे… आम्ही गेल्या तीन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रति लिटर 1 रुपये मोजत आहोत. वर्षानुवर्षे सबसिडी देत आहोत… आम्ही यावर 1,500 कोटी रुपये खर्च केले आहेत…”
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आमचे केंद्राकडून 97,000 कोटी रुपये येणे बाकी आहे… ज्या दिवशी आम्हाला अर्धी रक्कम मिळेल, त्याच दिवशी आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर 3,000 कोटी रुपयांची सबसिडी देऊ… मला सबसिडी द्यायला कोणतीही अडचण नाही. पण मी सरकार कसे चालवणार…?”
बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने पंतप्रधानांच्या बोलण्याला कोणीही उत्तर देऊ शकले नाही. असेही बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.
राज्यामुळे पेट्रोल-डिझेल महागले आहे, ही वस्तुस्थिती नाही – उद्धव ठाकरे
‘आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल-डिझेल महागले आहे, ही वस्तुस्थिती नाही’ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.