पिचड यांची निरंकुश सत्ता संपुष्टात : 40 वर्षांनंतर अकोलेत सत्तांतर
कर्मचाऱ्यांबरोबर डॉ. लहामटेंनी घेतले जेवण
दिवसभर उपाशी असणाऱ्या निवडणूक मतमोजणी कर्मचाऱ्यांना यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांनी भोजन दिले. भोजन करणाऱ्या या सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या समवेत बैठक घालून नवनिर्वाचित आमदार डॉक्टर किरण लहामटे व त्यांचे साथीदार विनय सावंत यांनी भोजन घेतले. या बाबीचे सर्वांनी कौतुक केले.
अकोले – अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तापालट झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी आपले समोरचे प्रतिस्पर्धी व भाजपचे उमेदवार वैभव पिचड यांचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे गेली चाळीस वर्षे निर्विवाद व निरंकुश सत्ता आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या पिचड घराण्याला मतपेटीने नाकारले असल्याचे आज पुढे आले.
डॉ. लहामटे यांना एक लाख 13 हजार 414 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार वैभव पिचड यांना 55 हजार 725 मते मिळाली. वंचित आघाडीचे उमेदवार दीपक पथवे यांना एक हजार 817 तर अपक्ष उमेदवार भिवा घाणे यांना एक हजार 14 मते मिळाली. त्या दोघांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत.
पॉलिटेक्निक कॉलेजच्या जवळील हॉलमध्ये आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी केले गेली. त्यातही डॉ. लहामटे आघाडी घेऊन पुढे गेले. त्यामुळे निवडणुकीचा ट्रेंड दिसून आला. या पोस्टल बॅलेट मध्येही डॉ. लहामटे यांना 584, पिचड यांना 298, पथवे यांना 18 तर घाणे यांना दोन मते मिळाली. पोस्टल बॅलेट पेपरची 13 मते नाकारली गेली. ती रिजेक्टेड म्हणून मानले गेले. तर पोस्टल बॅलेट पेपर मध्येही दोन मतदारांनी “नोटा’ नोंदवून आपली कोणत्याही उमेदवाराला पसंती नसल्याचे कळवले. एकूण सर्व फेऱ्यांमध्येही नोटाचा वापर झाल्याचे दिसून आले. एकूण दोन हजार 298 नोटा मते नोंदवली गेली.
त्यानंतर साडेआठ वाजता मतमोजणी सुरू झाली. एक एक फेरी होत असताना डॉ. लहामटे यांची मताधिक्यांची आघाडी वाढतच गेली. सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये पिचड यांना कोठेही आघाडी घेता आली नाही. हेच मतपेटीने दाखवून दिले.डॉ. लहामटे यांच्या मताधिक्यात वाढ होताना व बाहेर फेरीचा निकाल जाहीर झाल्यावर घोषणाबाजीचा जल्लोषही वाढतच गेला. गुलालाची उधळण, घोषणाबाजीचा आवाज वाढताना वरूण राजानेही टप्प्याटप्प्याने आपल्या सरींची बरसात वाढवली. तिची तीव्रता वाढवून विजयी उमेदवारांच्या समर्थकांना साथ दिली. पण त्यामुळे त्यांच्या उत्साहावर मात्र विरजण पडले.
पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी पहिल्या टप्प्यात संपली आणि त्यानंतर अन्य 22 फेऱ्या झाल्या.अशा एकूण 23 फेऱ्या कोणतीही गडबड गोंधळ न होता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न न निर्माण होता, या सर्व फेऱ्या सुरळीत पार पडल्या. विशेष बाब म्हणजे निवडणूक मतमोजणी सुरू असताना वंचित आघाडीचे उमेदवार दीपक पथवे, व अपक्ष उमेदवार भिवा घाणे निवडणूक मतमोजणीच्या ठिकाणी गायब होते. तर व्यासपीठावर निवडणूक निर्णय अधिकारी व प्रतिस्पर्धी उमेदवार बसून होते. परंतु प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांकडे ढुंकूनही पाहिले नाही.
प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर होताना बाहेर लहामटे समर्थकांचा जल्लोष वाढतच राहिला. मात्र गुलाल उधळण यापलीकडे फारसे काही घडले नाही.
शिवाय मतमोजणी संथ गतीने होत राहिल्याने निकाल जाहीर करण्यास सायंकाळचे पावणे चार वाजले. निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी निकाल जाहीर केल्यानंतर निवडणूक प्रमाणपत्र घेण्यासाठी डॉ. लहामटे यांनी ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, डॉ.अजित नवले, विनय सावंत, अमित भांगरे, संपत नाईकवाडी यांना सोबत घेतले आणि नंतर प्रमाणपत्र स्वीकारले.
यादरम्यान निवडणूक मतमोजणीच्या हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक भांगरे, अमित भांगरे यांनी विजयी उमेदवार किरण लहामटे यांना घट्ट मिठी मारून डॉक्टर नवले व इतर सहकाऱ्यांनी त्यांच्या अभिनंदन करून आपला आनंद व्यक्त केला.
त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत डॉ. लहामटे यांनी आपला आनंदाचा जल्लोष मतमोजणी केंद्राच्या बाहेर साजरा केला. त्यानंतर त्यांनी अगस्ती आश्रमात जाऊन अगस्ती महाराजांचे दर्शन घेतले. मिरवणूक न काढता त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपण पावसामुळे भात शेती व अन्य शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून नुकसान भरपाई पंचनामे करण्याच्या व मिळण्याच्या संदर्भात प्रशासनाकडे आग्रह धरणार आहोत. यासाठी आपण गावोगावी जाऊन दिवाळी साजरी करुन ही नुकसानभरपाई पाहणार आहोत. शिवाय येत्या दोन दिवसांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून तालुक्याच्या ठिकाणी किंवा अन्यत्र आभार सभा लावणार आहोत असे जाहीर केले.