दोन्ही मतदारसंघात अपयश : पक्षाचे चिन्हही गायब
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात अपक्षांना पुरस्कृत करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची खेळी अयशस्वी ठरल्याचे आज मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. चिंचवडमध्ये काही प्रमाणात हा प्रयोग यशस्वी होण्याच्या मार्गावर असतानाच पक्षाच्याच काही पदाधिकारी आणि नगरसेवकांनी कमळाला साथ दिल्याने अपयश आले. तर भोसरीत राष्ट्रवादीची ताकद असतानाही पुरस्कृतचा घेतलेला निर्णय सपशेल अयशस्वी ठरला.
एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहरावर एकहाती सत्ता गाजविणाऱ्या राष्ट्रवादीचा जनाधार 2014 पासून घसरला. तिकीटासाठी रांगा लावणाऱ्या इच्छुकांनी यावेळी पक्षाच्या तिकीटाऐवजी अपक्ष लढण्याचा आग्रह धरला. पिंपरी वगळता इतर राष्ट्रवादीने उमेदवार न देता अपक्षांना पुरस्कृत केले. पक्षाची ताकद अपक्षांच्या पाठिशी उभी केली मात्र अपेक्षित यश आले नाही. चिंचवड मतदारसंघात काही आजी-माजी नगरसेकांनी कलाटे यांना इमाने इतबारे साथ दिली तर काहीजणांनी “कमळ’ फुलविण्यात धन्यता मानल्याने या मतदारसंघात घात झाला. चिंचवड मतदारसंघात परिवर्तनाचा नारा देणाऱ्या राहूल कलाटे यांना राष्ट्रवादीने अपेक्षित रसद न पुरविल्याने निसटत्या पराभवाचे तोंड पहावे लागले. पक्षाची यंत्रणाही कामाला न लागल्यामुळे कलाटे यांना फटका बसला.
असाच प्रकार भोसरी विधानसभेतही घडला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने गेल्या दोन निवडणुकीत चांगली लढत दिली होती. पक्षाला आणि शरद पवार यांना मानणारा वर्ग असतानाही लांडे यांनी पक्षाच्या तिकीटावर न लढता अपक्ष लढण्याचा आग्रह धरला. त्याला वरिष्ठांनीही मान्यता दिल्यामुळे लांडे यांना पुरस्कृत करून मैदानात उतरविण्यात आले. पक्षाची आणि लांडे यांची यंत्रणाच शेवटपर्यंत कार्यरत न झाल्यामुळे लांडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
पक्षाची ताकद मिळालीच नाही
राष्ट्रवादी कॉंग्रेसने चिंचवड आणि भोसरीमध्ये उमेदवारांना पुरस्कृत केले मात्र पक्षाची कसलीच यंत्रणा या ठिकाणच्या उमेदवारांसाठी कार्यान्वित केली नाही. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरील मोजके पदाधिकारी वगळता इतरांनी उमेदवाराच्या विजयासाठी कामच केले नसल्याचे समोर आले आहे. पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे यांच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. मात्र, भोसरी व चिंचवडमध्ये त्याचा अभाव जाणवला.