नेवासा (प्रतिनिधी) – पोटचा मुलगा जन्मदात्या आईसह त्याच्या बायको व मुलांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याची माहीती धमकी देणाऱ्या मुलाच्या आईने नेवासा पोलीस निरिक्षक विजय करे यांना दिली. त्यामुळे निरिक्षक करे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तुळसीराम गिते,पोलीस नाईक दहिफळे, पो.कॉ.शाम गुंजाळ, रामदास वैद्य या पथकाला घटनास्थळी पाठवून शहरातील आरोपी सागर कुंभकर्ण यास गावठ्ठी कट्टा, जिवंत काडतुसासह मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,शहरातील पोस्ट ऑफिस समोरील औदुंबर चौकात राहणाऱ्या लताबाई किशोर कुंभकर्ण यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे निरिक्षक विजय करे यांना सांगितले की, माझा मुलगा सागर किशोर कुंभकर्ण हा त्याची पत्नी प्रांजल तसेच त़्याची मुलगी श्रेषा, माही, श्रावणी या सर्वांना आम्हाला माझा मुलगा लाथ्थाबुक्यांनी मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी देत असल्याची माहीती दिली. पो.नि.करे यांनी पथकाला घटनास्थळी पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी जात आरोपी सागर कुंभकर्ण यास पोलीसांनी ताब्यात घेतले.
पो.नि विजय करे यांनी सागर किशोर कुंभकर्ण यास विश्वासात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता, त्याने पोलीसांना सांगितले की, मला माझी आई,पत्नी व मुली हे कायम त्रास देतात. मी त्यांचा कायमचा काटा काढण्यासाठी एक गावठ्ठी कट्टा व जिवंत काडतुसे विकत घेतलेले असुन त्यांना मी ठार मारणार आहे अशी माहीती पोलीसांना दिली. सदर गावठ्ठी कट्टा व जिवंत काडतुसे मी माझ्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील कपाटात लपवुन ठेवलेली आहेत असे सांगितले.
त्यांनतर पो.नि करे, पो.हे.कॉ. गिते, पो.ना दहिफळे, पो.कॉ.शाम गुंजाळ, पो.कॉ.वैदय आरोपी सागर किशोर कुंभकर्ण असे सर्वजन सरकारी गाडीने त्याचे राहते घराजवळ गेले . तेथे पो. हे. कॉ. गिते यांनी दोन पंचांना बोलावुन त्यांना सागर कुंभकर्ण याने सांगितल्याप्रमाणे त्याचे घराच्या तिसऱ्या मजल्यावरील बेडरुमध्ये एक गावठ्ठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केले. त्यानंतर पोलीस कॉन्सटेबल शाम गुंजाळ यांच्या फिर्यादवरुन सागर कुंभकर्ण याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखला केला असुन सदर गुन्ह्यांत सागर कुंभकर्ण याला अटक करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विजय करे, पो.हे.कॉ तुळशीराम गिते, पो.ना.प्रतापसिंह दहिफळे, पो.कॉ.शाम गुंजाळ, पो.कॉ.रामदास वैद्य यांनी केली असुन पुढील तपास पो.हे.कॉ.तुळशीदास गिते पोलीस स्टेशन नेवासा हे करीत आहेत.