नाशिक – आदिवासी विकास विभागातील लेखा अधिकाऱ्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. भास्कर रानोजी जेजुरकर असे लाचखोर लेखा अधिकाऱ्याचे नाव आहे. जेजुरकर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथील वसतिगृहाच्या इमारतीचे 4 लाख 59 हजार 258 रुपयांचे थकीत घरभाड्याची बिले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यांच्याकडे पाठवण्यासाठी लेखा अधिकारी भास्कर रानोजी जेजुरकर यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा लावून जेजुरकरला 10 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीच्या इमारती आंबोली येथील दोन वसतिगृहांसाठी 2021 ते 2024 या भाडे कराराने दिलेल्या आहेत. इमारत क्रमांक 422/1 चे एप्रिल ते जून 2023 पर्यंतचे घरभाडे दोन लाख 93 हजार 994 रुपये तसेच इमारत क्रमांक 422/2 चे एप्रिल ते जून 2023 पर्यंतचे घरभाडे 1 लाख 656 हजार 264 रुपये असे एकूण चार लाख 59 हजार 258 रुपये थकीत घरभाड्याची बिले प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवण्यापूर्वी लेखा अधिकारी, भास्कर रानोजी जेजुरकर यांच्याकडे प्रलंबित होते. बिलांची पडताळणी करुन मंजुरीकरता सादर करण्यासाठी भास्कर जेजुरकर यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
दरम्यान, सरकारी अधिकारी, कर्मचारी कोणत्या कामासाठी तुमच्याकडे पैशाची मागणी करत असतील तर एसीबीला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.