नेवासा -नेवासा तालुक्यातील श्री देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून हभप श्री कृष्णा महाराज मते यांचा दि.6 मे रोजी पंचसंस्कार दीक्षा विधी सोहळा होणार असल्याची माहिती श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप भास्करगिरी महाराज यांनी दिली.
सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याच्या स्वभावामुळेच हभप कृष्णा महाराज मते यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय भक्त मंडळींच्या संमतीने घेण्यात आला असल्याचे भास्करगिरी महाराजांनी सांगितले. दि.6 मे रोजी सकाळी 8 ते 11 यज्ञ मंडपामध्ये होमहवनादी नामकरण विधी कार्यक्रम होईल. सकाळी 9 ते 11 सावखेडा येथील गिरी आश्रमाचे प्रमुख महंत कैलासगिरी महाराज यांचे कीर्तन होईल. सकाळी 11 ते 11.30 यावेळेत पुज्यनिय संतांचे व मान्यवरांचे शुभ संदेश व ब्रम्हवृंदाचा शांतीपाठ श्रींची आरती होऊन महाप्रसाद वाटपाने पंच संस्कार दीक्षा विधी सोहळ्याची सांगता होईल
सदरचा पंच संस्कार दीक्षा सोहळा श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व महंत देवेंद्रगिरीजी महाराज गुजरात, महंत वेदव्यास पुरीजी महाराज गुजरात, महंत इंद्रजित भारतीजी महाराज (अध्यक्ष गिरनार मंडल, गुजरात), श्री महंती नारायणगिरी महाराज (गाजियाबाद उ.प्र) भास्करगिरीजी महाराज तसेच परिसरातील सर्व संत-महंत उपस्थित राहणार आहे.
पंच संस्कार दीक्षा सोहळयाच्या निमित्ताने दिक्षीत व्यक्तीचा प्रथम खौर कर्म, अग्निहवन, पवित्र जलाभिषेक, पंचगुरू संस्कार विधी आदी संस्कार यथा विधी भेंडे (ज्ञानेश्वरनगर) येथील वेदशास्त्रसंपन्न पंडीत गणेश गुरू कुलकर्णी यांच्या पौराहित्याखाली वेदवाणीने होणार आहे.
हभप कृष्णा महाराज मते यांचे जन्मगाव हे नेवासा तालुक्यातील गोगलगाव असन, त्यांचे शिक्षण बारावी सायन्सपर्यंत झालेले आहे. आळंदी येथे सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर वृंदावन येथे दोन वर्षे श्रीमद भागवत कथा अभ्यास करून सलग पाच वर्षे पंढरपूर येथे चातुर्मास केले.त्यानंतर गणेशखिंड येथे असलेल्या हनुमान गड संस्थान येथे सलग नऊ वर्षे जबाबदारी सांभाळली.