सातारा – येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरी टप्प्यात आल्या असताना शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या मुसळधार पावसाने त्यावर पाणी फिरले आहे. त्यामुळे पुढील सामने पुढील सूचना येईपर्यंत स्थगित झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
मुसळधार वादळी पावसामुळे क्रीडा संकुलावर स्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या विद्युत दिव्यांची कमान कोसळल्याने नुकसान झाले आहे. सातारा तालुक्यासह माण, खटाव, कराड, सातारा, वाई या तालुक्यांना शुक्रवारी अवकाळी पावसाने सुमारे दीड तास झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यामध्ये नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसाचा फटका 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला बसला. शुक्रवारी माती आणि गादी गटातील 97 आणि खुल्या गटातील कुस्त्यांच्या उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने होणार होते. शनिवारी दि. 9 रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाच्या गदेचे वितरण करण्यात येणार होते. शरद पवार यांचा जिल्हा दौरा निश्चित झाला होता.
मात्र, जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या एकूण वेळापत्रक कार्यक्रमावर पाणी पडले. सातारा शहर आणि परिसरामध्ये सुमारे दोन तास पाऊस सुरू होता. जिल्हा क्रीडा संकुलामधील मातीचे आणि गादीचे आखाडे काही प्रमाणात खराब झाल्याचे संयोजकांनी सांगितले. मात्र, या आखाड्याची पावसापासून तात्पुरती सुरक्षा व्यवस्था ताडपत्री टाकून करण्यात आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे क्रीडा संकुलातील हॅलोजन दिव्यांची कमान एका बाजूने जोरदार वाऱ्यामुळे कोसळल्यामुळे नुकसान झाल्याचे संयोजकांनी कळवले आहे. क्रीडा संकुलातील महत्त्वाचे ध्वनिक्षेपक त्याचबरोबर डिजिटल गुणफलक तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.
एकूण तीन गादी आणि दोन माती अशा पाच आखाड्यांची रचना क्रीडा संकुलाच्या मध्यभागी करण्यात आली होती. त्यातील माती आखाड्याचे मुसळधार पावसामुळे नुकसान झाले आहे. मात्र, क्रीडा शौकिनांची या पावसामुळे घोर निराशा झाली आहे. परगावाहून लढतीसाठी जिल्ह्यात मुक्काम दिलेल्या पैलवानांना आता कुस्त्यांच्या तारखांची वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष बापूसाहेब मोहिते यांनी तात्काळ जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली. तसेच या स्पर्धा पुढील सूचना येईपर्यंत काही काळाकरता स्थगित करण्यात आल्याचे बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.