वाठार स्टेशन -वाठार स्टेशनकडून फलटणकडे जाणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एमएच-50-आर-2590) गुरुवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भरधाव वाहनाने ठोकरल्याने मोटारसायकलवरील महेश सतीश देशमुख (वय 26, रा. चोरे, ता. कराड) हा युवक ठार झाला. वाठार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाठार स्टेशन-फलटण रोडववरील आदर्की फाटा येथील एका ढाब्याजवळ भरधाव वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिली.
त्यात महेश देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. परिसरातील लोकांनी जखमीस ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे उपचारापूर्वीच देशमुख यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ते वाहन तेथे न थांबता निघून गेले. या अपघाताची खबर मिळताच वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले. सहाय्यक फौजदार गुजर तपास करत आहेत.