करोना उपचारासाठी पालिकेकडून सहा महिन्यांसाठी तातडीने नियुक्ती
पुणे – शहरात करोनाचे रुग्ण वाढत असतानाच पालिकेकडे रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक त्या संख्येने डॉक्टरच उपलब्ध नसल्याने महापालिकेला उपचाराच्या नियोजनाची मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, पालिकेस सहा महिन्यांसाठी तब्बल 177 डॉक्टर उपलब्ध झाले आहेत.
सहा महिन्यांसाठी एकवट वेतनावर पालिकेने या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे करोना रुग्णांवर उपचारासाठी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेस “बुस्ट’ मिळाला आहे. या डॉक्टरांमध्ये निवासी बीएएमएसचे तब्बल 108 तर बीएएमएसचे सुमारे 50 डॉक्टर आहेत.
शहरात रुग्णांचा आकडा आता दरदिवशी एक हजाराच्या घरात पोहचला आहे. त्यातच, महापालिकेकडून शहरात करोनाबाधितांवर उपचारासाठी 500 ते 1 हजारपर्यंतची कोविड केअर सेंटर सुरू झाली असून ती भरलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेस आवश्यक असलेले डॉक्टराच उपलब्ध नसल्याने कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर कामाचा ताण येत होता, त्यामुळे पालिकेने राज्यशासनाची विशेष मान्यता घेऊन सुमारे 600 डॉक्टरांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती.
मात्र, या भरतीची नियुक्तीपत्रे देताना पालिकेने या जागा 3 महिन्यांसाठी भरणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अवघे 18 जण या भरती प्रक्रियेत महापालिकेस मिळाले. त्यामुळे पालिकेने नव्याने सहा महिन्यांसाठी तातडीची भरती प्रक्रिया राबविली त्यात, तब्बल 177 डॉक्टर महापालिकेस मिळाले असून आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.