उत्सव : अबाऊट टर्न

हिमांशू

उठा! आज कुणीही मॉर्निंग वॉकसाठी आलेलं नाही. प्रदूषणाच्या विळख्यात थोडाफार ऑक्‍सिजन शोधण्यासाठी किंवा आजचा हृदयविकार उद्यावर ढकलण्यासाठी आपण मात्र कालही मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि उद्याही जाणार आहोत. तरुण मंडळी जिममध्ये आणि ज्येष्ठ मंडळी हास्यक्‍लबमध्ये नेहमीप्रमाणं जात राहतील. काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेते मॉर्निंग वॉकला येत होते. कुणी-कुणी तर जिममध्येही जाऊन आले. त्यांनीही अनेक दिवसांनी प्रदूषणमुक्‍त हवेचा आणि वातावरणाचा आनंद घेतला असेल.

परंतु कितीही बरं वाटलं तरी ते काही रोज-रोज येणार नाहीत. त्यांचा दिनक्रमच नव्हे तर आयुष्यक्रमही कधी ठरल्या वाटेनं जात नसतो. आपल्या दिनक्रमात मात्र फारसा बदल सहसा होत नाही. आपलं आयुष्य ठाशीव रस्त्यानं चालत राहिलं; चालत राहील. परंतु विश्‍वास ठेवा, नेतेमंडळींचं आयुष्य आपल्याला आपल्यापेक्षा अधिक सुखकर वाटतं, तसंच आपलंही दैनंदिन जीवन राजकीय नेत्यांना कधी-कधी अधिक सुखकर वाटत असणार. “नियतीच्या बैलाला…’ या विजय तेंडुलकरांच्या नाटकात हे परस्परविरोधी आकर्षण खूप रंजक पद्धतीनं मांडलंय. अर्थात नाटकात दाखवल्याप्रमाणं भूमिकांची अदलाबदल करणं आपल्याला शक्‍य होत नाही. नेतेमंडळी एकदाच मोठी सुट्टी घेऊन फॉरेनला वगैरे जाऊन येतात. आपण अधूनमधून मिळणाऱ्या सुट्या आपापल्या पद्धतीनं एन्जॉय करतो. परंतु आज सुट्टी असली तरी साप्ताहिक सुट्टीच्या वेळापत्रकानुसार ती घालवायची नाहीये. मतदान केंद्रावर जायचंच आहे!

मतदान केंद्रावरच्या रांगेत उभं राहणं हे आपल्याला पेट्रोल पंपाच्या रांगेत उभं राहण्यासारखं त्रासदायक कधीच वाटलेलं नाही. नखाला शाई लावून घेणं आपल्याला हातावर मेंदी रेखाटण्याइतकं सुंदर वाटत आलंय. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या यादीत आपलं नाव सापडलं की आपल्याला पेपरात नाव छापून आल्यासारखा आनंद होतो. मतदानाच्या ओळखपत्रावरचा आपला फोटो आपल्यालाही ओळखू येत नसतो. त्यामुळं कर्मचाऱ्यांना तो कसा ओळखणार, अशी शंका येऊन थोडा वेळ आपली छाती दडपतेही; पण कर्मचाऱ्यांना आपला चेहरा बघून फोटोतील व्यक्‍ती आपणच आहोत हे नेमकं कळतं आणि मग आपण सुटकेचा निःश्‍वास टाकतो. मतदान करण्यासाठी उभ्या केलेल्या आडोशाच्या मागे आपण जातो, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं या लोकशाहीचे राजे आहोत, असा भास होतो.

बटण दाबताना वाटतं, मीच आहे या देशाचा, राज्याचा शिल्पकार! ही जाणीव मोठी श्रेष्ठ आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला उत्सवासारखी वाटते, म्हणूनच या देशात लोकशाही टिकून आहे. वर्षाचा सण मानल्या गेलेल्या दिवाळीच्या उंबरठ्याशीच या पंचवार्षिक उत्सवाचा आनंद घेण्याची संधी यंदा आपल्याला मिळाली आहे. मतदान करून राजाच्या ऐटीत चालत बाहेर पडण्याचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडून मतदान केंद्रापर्यंत जाऊयाच!

राज्यात काही ठिकाणी आजही पाऊस पडणार आहे. (हा परतीचा मान्सून की वळीव हे अद्याप ठरलेलं नाही!) पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र खात्यानं वर्तवलेला असला, तरी किमान आज तो गांभीर्यानं घेऊ या. “पावसामुळं मतदानाला गेलो नाही,’ असं म्हणणाऱ्याच्या लग्नादिवशी नेमका पाऊस पडेल! पावसाचा रागरंग दिसल्यास तयारीनिशी बाहेर पडू; पण मतदान करूच! …आणि नंतर स्वतःला सांगू- निवडणूक हा लोकशाहीचा केवळ एक भाग आहे; संपूर्ण लोकशाही नव्हे!

Leave A Reply

Your email address will not be published.