नवी दिल्ली – काश्मीर आणि जम्मू भागातील लडाखमधील 380 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी यांची लवकरच लडाखमध्ये बदली करण्यात येणार आहे. ही बदली नवीन केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली तैनात करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
केंद्र सरकारने कलम 370 रद्द करत जम्मू-काश्मीरमधून लडाखला स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. लडाखचा नवा केंद्र शासित प्रदेश 31 ऑक्टोबर रोजी अस्तित्वात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या मुळ लडाख येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली करण्यास गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लडाखी वंशाच्या सुमारे 385 पोलीस कर्मचाऱ्यांची लडाख येथे बदली करण्यास मान्यता देण्यात आली असून ते 31 ऑक्टोबरला अस्तित्वात येणाऱ्या नवीन केंद्रशासित प्रदेशात काम करतील. हे पोलीस कर्मचारी गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या लडाख युनिटअंर्तगत काम करतील.तसेच अन्य केंद्र शासित प्रदेशातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते आणि वेतन त्यांना लागू करण्यात येणार आहे.
लडाखच्या केंद्रशासित प्रदेशात पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे लेफ्टनंट गव्हर्नरच्या थेट नियंत्रणाखाली असतील आणि त्यांच्यामार्फत केंद्र सरकारचे त्यावर नियंत्रण असेल.