दक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी बुटका, फनी, गतीमंत, दात पुढे आलेल्या ढेरपोट्या आणि ऍक्शन हिरो पासून रोमॅंटिक हिरोपर्यंतच्या सगळ्याच प्रकारच्या भूमिका पार पाडल्या आहेत.
“इंडियन’मध्ये तर त्यांनी बाप-बेट्याचा डबल रोलही केला होता. आता याच “इंडियन’चा सिक्वेल “इंडियन 2’चे शुटिंग कमल हासन करत आहेत. त्यामध्ये कमल चक्क 90 वर्षांच्या वयस्क व्यक्तीचा रोल साकारत आहेत. यासाठी इंडियनप्रमाणेच सिंथेटिक मेकअप केला जाणार आहे. “इंडियन 2’मध्ये या 90 वर्षाच्या कमल हासनला काही ऍक्शन सीनही करायचे आहेत.
ते कृत्रिम वाटू नयेत म्हणून कमल हासन यांनी स्वतःची बॉडी लॅंग्वेजही बदलली आहे. सगळे ऍक्शन सीन स्वतःच करायचा अट्टहास त्यांनी याहीवेळी जपला आहे. “इंडियन 2’मध्ये कमल हासन यांच्याबरोबर अनिल कपूर, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंह आणि विद्युत जमवाल हे प्रमुख भूमिकांमध्ये असाअर आहेत. पुढच्या वर्षी 14 एप्रिलला “इंडियन 2′ रिलीज होणार आहे. याहीवेळी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा एक स्वातंत्र्यसैनिक आपल्याला बघायला मिळणार आहे की आणखी काही ते थोड्या दिवसात समजेल.