नेवासे -श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात आषाढी वद्य कामिका एकादशीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. मात्र करोनाचे संकट पाहता प्रशासनाने आज नेवासे बंद ठेवल्याने मंदिर परिसरात व शहरात शुकशुकाट होता. मंदिरात पैसखांबासह माऊलींच्या मूर्तीस मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला.
एकादशीनिमित्त पहाटे शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत वेदमंत्रांच्या उच्चारात माऊलींच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला. यावेळी करोनाच्या संकटातून मानव जातीला मुक्त कर, असे साकडे माऊलींकडे घालण्यात आले. आषाढी वद्य कामिका एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मच्छिंद्र भवार, शांताबाई भवार, आशिष कावरे, श्यामलताई कावरे या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजेने मंदिरातील मुख्य माऊलींच्या पैस खांबासह विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीस दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला.
त्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी मच्छिंद्र महाराज निकम, नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ आढाव, मंदिर विश्वस्त रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. करणसिंह घुले, संत सेवक जालिंदर गवळी, गोरख भराट, मयूर डौले, मयूर दारुंटे, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास पठाडे उपस्थित होते. प्रशासनाच्या सामाजिक अंतराचे पालन करत सकाळचा अभिषेक विधी करण्यात आला.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आयोजित नेवासे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला, तरी माऊलींचे दर्शन न झाल्याची खंत प्रत्येक वारकरी भाविक व्यक्त करताना दिसत होता.
कामिका एकादशीला दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरते. दिवसभरात सुमारे चार ते पाच लाख भाविक दर्शन घेतात. सुमारे शंभर ते दीडशे दिंड्या हजेरी लावतात. मात्र यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव पाहता नेवासे बंदचा निर्णय घेतल्याने अनेक माऊली भक्तांनी नाराजी ही व्यक्त केली. नेवासे बंदच्या काळात प्रशासकीय पातळीवर तहसीलदार रुपेश सुराणा व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शहर व मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवला.