नगर – शहरासह ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढत असून, नगर तालुक्यातील घोसपुरी, चास, विळद, बुऱ्हाणगर, नागरदेवळे, नवनागापूरमध्येही करोनाचा शिरकाव झाला आहे. घोसपुरी या गावात 8 करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, संपूर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असल्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले.
गावातील एक व्यक्ती सोमवारी (दि. 13) करोनाबाधित आढळून आली होती. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव नमुने घेतल्यानंतर त्याच्या घरातील दोघांसह संपर्कातील एक, असे आणखी तीन व्यक्ती करोनाबाधित आढळले. त्यानंतर गावातीलच एक व्यक्ती, त्याची पत्नी व मुलाने दोन दिवसांपूर्वी खासगी करोना टेस्ट लॅबमध्ये स्राव तपासणीसाठी दिले होते.
बुधवारी (दि.15) रात्री उशिरा या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच गुरुवारी (दि.16) रोजी सकाळी सारोळा कासार आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. सुविधा धामणे, आरोग्य सेविका इंदुमती गोडसे, वर्षा धामणे, आरोग्यसेवक राजाराम वाबळे यांच्यासह पथकाने घोसपुरी येथे जावून बाधित रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. परिसरातील सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, अस्तगाव आदी गावांमधील ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान, आज गुरुवारी (दि.16) दुपारी जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमधील अहवालात घोसपुरी येथील आणखी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 8 झाली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात 46 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये नगर मनपा 17, नेवासे-11, भिंगार, जामखेड, संगमनेर येथील प्रत्येकी दोन, कर्जत, पाथर्डी, राहुरी, श्रीगोंदा येथील प्रत्येकी एक, राहाता तीन, तर श्रीरामपूरच्या चार रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 773 झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात 167 रुग्णांची वाढ झाली.
अकोलेत दुसऱ्या करोना रुग्णाचा मृत्यू
अकोले तालुक्यात करोनाने दुसरा बळी घेतला आहे. अकोले तालुक्यातील लहीत येथील 29 वर्षीय तरुणाला 12 जुलै रोजी त्रास होत होता. त्यामुळे त्याला 13 रोजी संगमनेर येथे उपचारासाठी दाखल केले होते. 14 जुलैरोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवलेला होता. मात्र त्रास वाढल्याने त्याला नगर येथे हलविण्यात आले होते. काल रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात करोनामुळे दुसरा बळी गेला आहे.