अहमदाबाद ( AAP leader beaten up in Gujarat ) – गुजरातमधील आम आदमी पार्टीचे नेते मनोज सुराथिया यांना सुमारे 10 जणांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री सूरत शहरातल्या कापोदरा भागातल्या “आप’च्या कार्यालयाजवळ घडला असून या मारहाणीमध्ये सुराथिया हे जखमी झाले आहेत. मात्र या मारहाणीच्या घटनेमागे भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचा आरोप “आप’चे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
भाजपने “आप’चा हा आरोप फेटाळून लावला आहे. जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी हा ड्रामा केला जात असल्याची टीका भाजपने केली आहे. उलट भाजपच्या 3 कार्यकर्त्यांना “आप’च्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोपही भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.
सोराथिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे सूरत पोलिसांनी “एफआयआर’ दाखल करून घेतली आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्यावतीने हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप “आप’चे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी केला आहे.