बॉलीवूडमध्ये परफेक्शनिस्ट अशी ओळख निर्माण करणारा अभिनेता आमिर खान याचा मुलगा जुनैददेखील अभिनयात आपले नशीब आजमावणार असून तो लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. जुनैद खान हा आपल्या आगामी चित्रपटाची काही दिवसांपासून तयारी करत असल्याचे समजते. तो यशराज फिल्म्सच्या निर्मित चित्रपटातून या इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटासाठी जुनैदसोबतच्या मुख्य नायिकेला देखील साईन करण्यात आले आहे.
जुनैदच्या अपोझिट “अर्जुन रेड्डी’ फेम तेलुगूमधील आघाडीची अभिनेत्री शालिनी पांडेला साइन करण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे शालिनी पांडेदेखील लवकरच रणवीर सिंहसोबत “जयेशभाई जोरदार’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. शालिनीने यशराज फिल्म्ससह 3 चित्रपटांचा करार केला असून यातील जुनैदचा डेब्यू चित्रपट हा तिचा दुसरा चित्रपट असणार आहे.
दरम्यान, या चित्रपटात जुनैद आणि शालिनीशिवाय शर्वरी वाघदेखील काम करणार असल्याचे वृत्त आहे. परंतु चित्रपट निर्मात्यांनी जुनैदच्या या डेब्यू चित्रपटातील कास्ट निश्चित केलेले नाही. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षीच्या सुरुवातीस करण्यात येणार असून याचे दिग्दर्शन सिद्धार्थ मल्होत्रा करणार आहे.