बॉलीवूड अभिनेता संजय दत्त काही दिवसांपासून त्याच्या लंग कॅन्सरमुळे सतत चर्चेत होता. आता तो या आजारातून बरा होत असून त्याने आपल्या आगामी “केजीएफ चॅप्टर -2’चे शूटिंग सुरू केले आहे. सध्या संजय हा चित्रपटातील मुख्य अभिनेता यश याच्यासोबत हैदराबाद येथे एक मोठा क्लाइमॅक्स सीन शूट करत आहे.
या सीनमध्ये अनेक स्टंट आणि फाइट सीन असणार आहे. चित्रपटाचे डायरेक्टर प्रशांत नील यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटो संजय दत्त हा स्टंट मास्टरसोबत बोलताना दिसत आहे.
हा फोटो शेअर करत प्रशांतने लिहिले की, “हा रॉकीचा क्लाइमॅक्स आहे. डेडली फाइट मास्टर अनबारिवसोबत अधिरा.’ दरम्यान, “केजीएफ चॅप्टर-2’मध्ये संजय दत्त हा खलनायकाची भूमिका साकारत असून त्याचे नाव अधिरा असे आहे.
विशेष म्हणजे, हा सीन पूर्ण होताच चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण होणार आहे. या महिनाच्या अखेरपर्यत हे शूटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. या चित्रपटात यश आणि संजय दत्तसह रवीना टंडनदेखील एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज करण्यात येणार आहे.