नवी दिल्ली – झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेल्या मनि लॉंड्रिंगच्या पुराव्याचा भाग म्हणून त्यांनी खरेदी केलेला फ्रिज आणि स्मार्ट टीव्हीच्या पावत्या ईडीने कोर्टात सादर केल्याची बाब समोर आली आहे. सोरेन यांनी ३१ कोटी रुपयांहून अधिक किमतीची ८.८६ एकर जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने या पावत्या पुरावे म्हणून सादर केल्या आहेत.
ईडीने या पावत्या रांचीस्थित दोन डीलर्सकडून मिळवल्या आहेत. या पावत्या गेल्या महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात त्या जोडल्या. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी कथित जमीन हडप केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. ते सध्या रांची येथील होटवार येथील बिरसा मुंडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.
ईडीच्या म्हणण्यानुसार, या दोन वस्तु संतोष मुंडा यांच्या कुटुंबीयांच्या नावावर खरेदी करण्यात आल्या होत्या. मुंडा यांनी एजन्सीला सांगितले की ते हेमंत सोरेन यांच्या या जमिनीवर १४ वर्षापासून या मालमत्तेचे केअरटेकर म्हणून राहत आहेत.
एजन्सीने मुंडा यांच्या विधानाचा उपयोग सोरेन यांच्या या जमिनीशी कोणताही संबंध नसल्याच्या दाव्याचा प्रतिकार करण्यासाठी केला. ईडीने जमिनीच्या तुकड्यावरील राजकुमार पाहन नावाच्या व्यक्तीचा दावाही फेटाळला. सोरेन यांना वाचवण्यासाठी त्यांनी हा दावा केल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
फेडरल प्रोब एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ही जमीन मूळत: ‘भुइनहरी’ मालमत्ता होती जी सामान्य परिस्थितीत कोणालाही हस्तांतरित किंवा विकली जाऊ शकत नाही आणि ‘मुंडा’ आणि पाहन हे अशा जमिनीच्या मालमत्तेचे मालक होते.त्यावर सोरेन यांनी ताबा मिळवला.